वळसंग येथे आडात पडलेल्या कोल्ह्यास सुरक्षित बाहेर काढण्यात वन विभागाला यश

कोल्ह्यास जत येथील अंबिका मंदिर परिसरातील वनक्षेत्र आदिवासात सोडून दिले


जत/प्रतिनिधी: वळसंग ता.जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळे जवळ असलेल्या पुरातन पडीक आडात शनिवारी रात्री कोल्हा पडला असल्याचे निदर्शनास आले. जत वनविभागाने आडात पडलेल्या कोल्ह्यास तासभराच्या अथक प्रयत्नाने रविवारी दुपारी ४ वाजता सुरक्षित‌ बाहेर काढले.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळे जवळ पुरातन पडीक आड आहे. हे आड वापरात नाही. तसेच सभोवताली काटेरी झाडे आहेत. शनिवारी पाऊस असलेने या आडाकडे कोणीही पाहिले नव्हते. सकाळी आडातून आवाज आल्याने ग्रामस्थांनी जाऊन पाहिले असता कोल्हा पडल्याचे दिसून आले. पोलिस पाटील राजूू कुंभार यांनी ही माहिती बीट वनपाल चंद्रकांत ढवळे यांना दिली.

      वनविभाच्या कर्मचाऱ्यांनीही कार्यतत्परता दाखवत पिंजरा, दोर व इतर साहित्य घेऊन घटनास्थळी हजर झाले. पडीक आडात पाणी असल्याने कोल्हा पाण्यात पोहत होता व ओरडत होता. कर्मचा-यांनी दोरीला बांधून पिंजरा आडात सोडला. कोल्ह्याला हुसकावले असता तो अलगद पिंजरात आला. वनविभागाने स्थानिकांच्या मदतीने कोल्ह्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. पिंजऱ्यात कोंडून जत येथील अंबिका मंदिर परिसरातील वनक्षेत्र आदिवासात सोडून दिले. यादरम्यान कोल्ह्याला कसल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. वनविभागाच्या कर्मचा-यांनी वेळेत हालचाल केली नसती तर कोल्ह्याला आपले प्राण गमवावे लागले असते. यामुळे परिसरातील नागरिकांकडून कर्मचाऱ्यांचे कौतूक होत आहे.

स्थानिकांच्या मदतीने ही मोहिम फत्ते केली. वन विभागाचे बिट वनपाल ऑफिसर चंद्रकांत ढवळे वन रक्षक गणेश दुधाळ, महादेव मुसळे, निलेश शारबिद्रे, तलाठी विशाल उदगिरी, वन विभाग कर्मचारी निलेश जैनाळकर, वन मजुर आप्पासाहेब निळे, नामदेव काळे, राजु मलमे, हणमंत बिराप्पा कोळी, अजित पुजारी यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.


Post a Comment

0 Comments