संकटातून मार्ग काढण्यासाठी जिल्हावासियांना शक्ती मिळो- पालकमंत्री जयंत पाटील


सांगली : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी ठीक 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शासनाच्या निर्बंधांचे पालन करून हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करण्यात आला. 

यावेळी यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोविडमुळे जी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे कामगार आणि कष्टकरी वर्गावर फार मोठे संकट उभे राहीले आहे. त्यातून मार्ग काढण्याची आपणा सर्वांना शक्ती मिळो. सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोनाचा वेग सध्या स्थीर झाल्यासारखा दिसत आहे. येत्या काळात प्रतिबंधक निर्बधांचे आपण कडक पालन केल्यास आणखी वेग कमी झालेला दिसेल. आज महाराष्ट्र अनेक बाजूंनी संकटात आहे. अशावेळी या संकंटाचा धिराने मुकाबला करून मार्ग काढण्याची शक्ती आपण सर्वांना मिळो अशा शुभेच्छा सर्वांना दिल्या.

कोरोनाची दुसरी लाट सध्या सुरू आहे. कोरोनाची तिसरी लाट कधी येईल याबाबतचे भविष्य काहीजण वेगवेगळे करत आहेत. कोविड पासून बचाव करण्याच्या पध्दतीमध्ये आपल्या व्यवस्था अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न करणे हा त्यावरचा उपाय आहे असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंधांचे काटेकारेपणे पालन केल्यास आपण कोविड प्रादुर्भावावर मात करू शकू. ऑक्सिजन प्लाँटसाठी ऑर्डर दिली असून हे काम लवकरात लवकर करण्यासाठी जिल्हा प्रशासन पाठपुरावा करत आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार 18 ते 44 वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येईल. वाढलेली रूग्णसंख्या तसेच काही रूग्णांना पॉझीटीव्ह आल्यानंतर दोन ते तीन दिवसातच व्हेंटीलेटर लावण्याची गरज भासत आहे. त्यामुळे व्हेंटीलेटरचा तुटवडा भासत आहे. 25 व्हेंटीलेटर आले असून ते कार्यान्वीत करण्याचे काम सुरू आहे. तसेच आणखी 20 व्हेंटीलेटर आले असून त्यातील 17 व्हेंटीलेटर खाजगी रूग्णालयांना तर 3 व्हेंटीलेटर शासकीय रूग्णालयांना दिले आहेत. ही स्थिती पहाता जोपर्यंत आपण सोशल डिस्टन्सींगचे पालन करत नाही, आपल्यावर घातलेली बंधने पाळत नाही तोपर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होणार नाही. जनतेने स्वयंस्फूर्तीने शासनाने, प्रशासनाने घालून दिलेल्या बंधनांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments