जत येथे अंगावरून गाडी गेल्याने एकाच जागीच मृत्यू


जत,प्रतिनिधी: शहरातील छ.संभाजी चौक येथे असलेल्या महीबुब सुभानी दर्ग्यासमोर दहा चाकी अशोक लेलँड गाडीच्या मागील चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात सदाशिव कल्लाप्पा व्हणखंडे (वय ६८ रा.कणसेवाडा, शिवाजी पेठ जत) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

        याबाबत अधिक माहिती अशी की, सदाशिव व्हनखंडे हे मंगळवार बाजार पेठेतून घराकडे येत होते तर अशोक लेलँड ट्रक क्रमांक एम एच ४४/वाय ५७३५ सोलंकर चौकातून संभाजी चौकाकडे जात होता. संभाजी चौकालगत असलेल्या महीबुब सुभानी दर्ग्याच्या समोर अरुंद रस्ता आहे. या अरुंद रस्त्यालगत नागरिकांनी रस्त्याच्याकडेला दगड टाकले आहेत. त्यामुळे आणखी रस्ता अरुंद झाला आहे. रस्त्यावरून घरी येत असताना ट्रकचा धक्का लागून सदाशिव व्हनखंडे हे खाली पडले. त्यानंतर पाठीमागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

        घटना घडल्यानंतर ट्रक चालकाने ट्रक तसाच पुढे संभाजी चौक पार करून पुढे नेला होता. परंतु उपस्थित नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पुढे त्याला थांबवले, त्यानंतर ट्रक चालकाने ट्रक तेथेच सोडून पलायन केले आहे. सदाशिव व्हनखंडे हे जत येथे एकटे राहून चर्मकार व्यवसाय करत होते. त्यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असून त्यांच्या पश्चात तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. तिन्ही मुलींची लग्ने झाली आहेत, तर मुलगा हा पुणे येथे नोकरी करत आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे संत रोहिदास नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अर्चना खांडेकर करत आहेत.

Post a Comment

0 Comments