जत पोलीसांचे वाळू तस्करांना बळ? तर महसूल विभागाच्या छुप्या पांठिब्यामुळे तालुकाभर वाळू तस्करांचे फुटले पेव । तालुक्यात उलट-सुलट चर्चेला उधाणजत,प्रतिनिधी: जत पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वाळू तस्करांना बळ देण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा सध्या जत तालुक्यात सुरू आहे. महसूल विभागाचे दुर्लक्ष किंबहुना छुप्या पांठिब्यामुळे तालुकाभर वाळू तस्करांचे पेव फुटले असून जत पश्चिम भागातील कुडणूर ओढापात्र, तलावे व जत उत्तर भागातील सिंगनहळी ते वाळेंखिडीतील कोरडा नदी पात्र वाळू तस्करीचे अड्डे बनली आहेत. जत उत्तर भागातील तस्करांना थेट महसूल प्रशासना बरोबर पोलीसांचेही अभय असल्याचे बोलले जात आहे. तर जत पश्चिम भागात कामगिरीवर असलेल्या महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी इमान इतबारे वजन ठेवले जात असल्याने सर्वकाही उघड्यावर, दिवसाढवळ्या सुरू आहे. तालुक्यात वाळू तस्करी करणारे एखादे वाहन पकडले तर महसूल प्रशासन ते वाहन पोलीसांच्या ताब्यात देतात. पोलिस ठाण्यात लावलेले वाहन आमचा काही संबंध नाही, ती महसूल विभागाची कारवाई असल्याचे सांगत पोलिस सोयीनुसार कार्य करत आहेत. त्यामुळे एकाला न्याय तर दुसऱ्यावर अन्याय करत असल्याचे आरोप होत आहेत.

काही दिवसांपूर्वी जत शहरात बेकायदा वाळू वाहतूक करत असलेला डंपर तहसीलदार सचिन पाटील यांनी पकडला. जत तालुक्यातील सिंगनहळ्ळी, बागलवाडी, वाळेखिंडी परिसरातून बेकायदा वाळू तस्करी वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन पाटील यांनी रात्री गस्त सुरू केली होती. परंतु महसूल विभागाने पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिलेली वाहने व त्या वाहनात असलेली वाळू रातो रात गायब होण्याचे प्रकार समोर येत आहेत.

जत तालुक्यातील वाळु तस्करांना कुणाचेच भय राहिलेले नाही. शहरासह तालुक्यात वाळू वाल्यांनी अक्षरशा हैदोस घातला आहे. याकडे ना प्रशासनाधे लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींचे आहे. यामुळे नागरिकांचे महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे? प्रशासनाने यात लक्ष घालून वेळीच वाळुतस्करांना आळा घालावा अशी मागणी सर्व सामान्य जनते मधून होत आहे.

काही दिवसांपूर्वी येळवी (ता.जत) येथून बेकायदेशीर वाळू उत्खनन करून जाणाऱ्या वाळूच्या डंपरला रोखण्याचा प्रयत्न कोतवाल यांनी केला. डंपर चालकांनी कोतवाल बाळू चव्हाण यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसपाटील यांचे पती सचिन माने - पाटील यांना धक्काबुक्की करण्यात आली. वाळूतस्करांनी एका तासहून अधिकवेळ धिंगाणा घालून डंपर पळवण्याचा प्रयत्न केला. एक डंपर पकडून पोलिस व महसूल खात्याच्या ताब्यात देण्यात आला. ही घटना समजताच घटनास्थळी तहसीलदार सचिन पाटील तात्काळ दाखल झाले.

Post a Comment

0 Comments