दरीबडचीतील १९ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; दोघेजण ताब्यातजत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील दरीबडची येथे १९ वर्षीय युवकाचा प्रेम संबंधातून धारधार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. धनाजी भागाप्पा टेंगले (वय १९ रा. टेंगले वस्ती,दरीबडची ) असे मयत युवकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री ८:३० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी दोन संशयित आरोपी राजु बाळू लेगरे वय २१ वर्षे रा. पाढरेवाडी व आदीनाथ हक्के वय १९ वर्षे रा. खंडनाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

        घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दरीबडची गावापासून पांढरेवाडी फाट्याजवळ मयत धनाजी टेगले हा आई वडिलांसोबत राहत होता. धनाजी रात्री दूध घालण्यासाठी दरीबडची येथे एम एच ४५ के ०२८९ क्रमांकाची मोटरसायकल घेऊन गेले होते. दूध घालून परत येताना कुलाळवाडी दरीबडची रस्त्यावर गाडी अडवून धारधार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. तसेच मोटारसायकल अंगावर टाकली होती. आरोपींनी हा अपघात भासविण्याचा प्रयत्न केला होता. गाडी आडवून तोंड दावल्याने आवाज आला नाही. रस्त्यावर रात्री वर्दळ नसल्याने घटनेची माहिती समजली नाही. रात्री १० वाजले तरी धनाजी घरी आला नसल्यामुळे वडिलांनी शोधाशोध सुरू केली. रात्री साडेदहाच्या दरम्यान धनाजी टेंगले हा रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु डोक्याला कानावर वर्मी घाव लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 

         घरातील लोकांनी या घटनेची माहिती जत पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, सहायक निरीक्षक महेश मोहिते, उमर फकीर यांनी तातडीने दरीबडची येथील घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणी संबंधित दहा ते बारा जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसी खाक्या दाखवताच यातील संशयित आरोपी राजू लेंगरे रा. दरीबडची व आदिनाथ हक्के रा. पांढरेवाडी या दोघांनी हा खून आपणच केल्याचे पोलिसांना कबुली दिली. पोलिसांनी उर्वरित आरोपींना सोडून या दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मृतदेह शवविच्छेदन करुन कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण भाऊ असा परीवार आहे. फिर्याद वडील भागाप्पा टेंगले यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक निरीक्षक महेश मोहिते करीत आहेत.

नावाच्या गोंधळातून महिलेने गमावला जीव:-

टेंगले वस्तीवर धनाजी टेंगले नावाचे दोघे जण आहेत. त्यातील घनाजी महादेव टेंगले याचे दरीबडचीत सोना चांदीचे दुकान आहे. तोही रात्री कामानिमित्त घराबाहेर गेला होता. मृत घनाजी भागाप्पा टेंगले व धनाजी महादेव टेंगले यांची घरे हाकेच्या अंतरावर आहेत. मृत धनाजीची बातमी वस्तीवर समजली. धनाजी महादेव टेंगले यांची आई प्रीताबाई टेंगले यांनाही धनाजीचा खून झाल्याची माहिती समजली, पण आपलाच घनाजी मृत झाला असा त्यांचा समज झाला. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला व पहाटे त्यांचे निधन झाले.

Post a Comment

0 Comments