कोरोना रुग्ण औषधोपचाराविना परत जाऊ नये यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवावा- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी । होमआयसोलेशन मधील व्यक्ती खुलेआम फिरताना दिसल्यास तातडीने गुन्हे दाखल करा


 सांगली : कोरोनाचा रुग्ण औषध उपचाराविना परत जाऊ नये याबाबतची खबरदारी संबधितांनी घ्यावी, कोरोना उपचारासाठी बेड उपलब्ध नाहीत यासाठी रुग्णांना व नातेवाईकांना वणवण करत फिरावे लागू नये यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची असून नेमणूक केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. 

 वाळवा तालुक्यातील कोरोना उपचार व्यवस्था, हॉस्पिटलांची स्थिती याबाबत आढावा बैठकी अप्पर तहसिलदार कार्यालय, आष्टा येथील आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी इस्लामपूर उपविभागीय अधिकारी विजय देशमुख, तहसिलदार रविंद्र सबनिस, अप्पर तहसिलदार दिक्षांत देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील, आष्टा नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण, पोलीस निरिक्षक अजित सिद्द, वैद्यकीय अधिकारी, खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर आदि उपस्थित होते. 

 जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, होमआयसोलेशन मध्ये असलेल्या व्यक्तींची यादी तयार करण्यात यावी व त्यांना स्थानिक प्रशासनामार्फत खुलेआम न फिरण्याबाबत नोटीस बजावण्यात यावी. तरीही होमआयसोलेशन मध्ये असलेले व्यक्ती खुलेआमपणे बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच अशा व्यक्तींना कोविड केअर सेंटरमध्ये (सीसीसी) पाठविण्यात यावे. कोरोना रुग्णांना मार्गदर्शन मिळण्यासाठी तालुकास्तरीय हेल्पलाईन क्रमांक 24X7 चालू ठेवण्यात यावेत. याठिकाणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात यावेत, हेल्पलाईन क्रमांक नागरिकांना समजावा यासाठी त्याचा जास्तीतजास्त प्रसार करावा, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेली रुग्णालये सुसज्ज करण्यात यावेत, ज्याठिकाणी अपुऱ्या सोयी असतील त्या तातडीने पुर्ण करुन घेण्यात यावेत. रुग्णालयांमध्ये आग्निशमन यंत्रणा, ॲम्बुलन्स सेवा, ऑक्सिजन या अत्यावश्यक सेवांचा आढवा घेऊन त्या सज्ज ठेवाव्यात. 

 कोरोनाचा वाढता धोका पाहता रुग्णांची संख्या वाढेल त्यासाठी नविन कोविड केअर सेंटर (सीसीसी) उभारावे लागल्यास त्याबाबतची तयारीही करण्यात यावी. त्यासाठी लागणारी जागा, शासकीय इमारती याची पाहणी करुन निश्चित करण्यात यावेत. याठिकाणी आवश्यक ती यंत्र सामुग्री लागणार हे गृहित धरुन तशीही तयारी स्थानिक प्रशासनासमवेत करावी. असे सांगून जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना रुग्णालयास आवश्यक असणारा कर्मचारी तातडीने भरुन रुग्णालये सुरु करावीत आवश्यक वाटणाऱ्या कर्मचारी, डॉक्टर्संची मागणी प्रशासनाकडे सादर करावी. याबाबत तातडीने आदेश निर्गमित करण्यात येतील. रेमडेसिव्हर औषधे ही केवळ कोराना उपचार करणाऱ्या हॉस्पिटल व सलग्नीत मेडिकल शॉपमध्येच उपलब्ध करण्यात येणार असून या ठिकाणाहूनच या औषधांचे वितरण होण्याबाबत काटेकोरपणे अंमलबाजवणी व्हावी. रेमडेसिव्हर औषध उपलब्धतेबाबत प्रशासनाकडूनही सहकार्य केले जाईल. त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी सॅनिटाझर, हॅन्डवॉश यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही ते म्हणाले. 

 जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आष्टा येथील आण्णासाहेब डांगे अभियंत्रिकी महाविद्यालय येथे सुरु होत असलेल्या कोरोना रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील साधनसामुग्री, सोयीसुविधा, ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा याबाबतच्यासूचना संबधित यंत्रणेला दिल्या.

Post a Comment

0 Comments