शेगाव येथे सव्वा लाखाचा गांजा जप्त । स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाईजत,प्रतिनिधी: शेगाव ता.जत येथील तानाजी जगन्नाथ शिंदे (वय ६२  रा. शिंदे मळा, शेगांव) यांच्या गव्हाच्या शेतात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने छापा मारून एक लाख २९ हजार रुपये किमतीची २१ किलो ५०० ग्राम वजनाची लहान मोठी मिळून २५ ते ३० तयार गांजाची झाडे जप्त केली आहेत. ही कारवाई बुधुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. याप्रकरणी तानाजी शिंदे यास अटक करण्यात आली आहे.

        याबाबत अधिक माहिती अशी की, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शेगांव ते गुळवंची रस्त्यावर शेगांव पासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील तानाजी शिंदे यांच्या गव्हाच्या शेतावर पोलिसांनी आचानक छापा मारून तयार गांजाची २५ ते ३० लहान मोठी झाडे जप्त केली आहेत. शिंदे यांनी घरासमोरील रानात असलेल्या गव्हाची मळणी केली होती परंतु गांजाची झाडे तशीच शेतात ठेवली होती. याची माहिती रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर खात्री करून पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तानाजी शिंदे यांच्या विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments