महादेव बुरुटे हे खऱ्या अर्थाने साहित्यरत्न । शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांचे गौरवोद्गार


जत, प्रतिनिधी: बुरुटे यांची दिव्यांगत्वाची टक्केवारी, त्यांचे ग्रामीण भागातील वास्तव्य पहाता प्रतिकूल परिस्थितीतही घेतलेल्या शिक्षणाचा आधार घेऊन मराठी साहित्याच्या रुपाने स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता ते खऱ्या अर्थाने साहित्यरत्न आहेत.' असे गौरवोद्गार सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे यांनी काढले. 

       शेगाव, ता. जत येथील कवी, साहित्यिक महादेव बुरुटे यांचा ते माजी विद्यार्थी असलेल्या शेगाव येथील जि. प. मराठी शाळेतर्फे बुरुटे यांना सीबीएस न्यूज मराठी मिडिया परिवाराकडून देण्यात येणारा साहित्यरत्न पुरस्कार 2021 मिळाले बद्दल ग्रंथ देऊन मानाचा फेटा बांधून जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती शेगाव चे अध्यक्ष मा. शरद शिंदे, मुख्याध्यापक मा. राजाराम यादव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, 'त्यांची आजमितीला दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी १९८५ पासून इंग्लिश, गणित सारख्या विषयात अनेक विद्यार्थ्यांना नियमितपणे यशस्वीरीत्या मार्गदर्शन केले आहे.' बुरुटे यांनी 'मी जिथे श्रीगणेशा गिरवला. माझा हात धरून गुरुजीनी ग म भ न शिकवले. त्या अक्षरांनी माझ्या दुर्धर जगण्यात आनंद फुलविला. मला सन्मानाचे, समाजोपयोगी जगणे दिले. धन्य झालो. हा सत्कार माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे. मी हा प्रसाद नतमस्तक होऊन स्विकारतो आहे.' या शब्दांत शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. 

        यावेळी वसंतराव माने सर, रमेश विठ्ठल सावंत, नागनाथ घोडके, धनंजय नरळे, उद्धवराव शिंदे इ. शिक्षक व अनेक मान्यवर उपस्थितीत होते. बुरुटे यांना अ. भा. मराठी साहित्य संमेलनात, शासकीय ग्रंथोत्सवात निमंत्रित कवी, सांगली जिल्हा परिषदेचा दिव्यांग प्रेरणा पुरस्कार सह अनेक सन्मान मिळाले आहेत.

Post a Comment

0 Comments