जतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ८७ वर्षाच्या खुर्चीचे पूजन


जत,प्रतिनिधी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे जतन केली गेली आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ५ मार्च १९३४ रोजी जत दौऱ्यावर आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जत दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरातील विजय कॉलनी येथील बारुद शिंदेमामा यांच्या घरी भेट दिली होती. व विसावा घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिंदेमामा यांच्या घरी आराम केला होता. त्यावेळी त्यांनी तेथील खुर्चीत आराम केला. ती खुर्ची शिंदेमामा कुटुंबीयांनी आजही जिवापाड जपली आहे. ५ मार्च रोजी या घटनेला ८७ वर्षे पूर्ण झाली. शहरातील आंबेडकरप्रेमींनी शिंदेमामा यांचे घर गाठले व ज्या खुर्चीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसले होते त्या खुर्चीचे पूजन केले. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, जत नगरपरिषदेचे माजी सभापती, विद्यमान नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांच्यासह आंबेडकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संजय कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. भूपेंद्र कांबळे यांनी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते ही बाब कायम समाजकार्य करणाऱ्यांना प्रेरणा देणारी असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments