ठिबक सिंचन योजनेचा लाभ यावर्षी सरसकट सर्वांना द्या; संतोष पाटील । लकी ड्रॉ पद्धतीमुळे जत तालुक्यातील हजारो गरजू शेतकरी वंचित; शेतकऱ्यांतुन नाराजी


जत,सोन्याळ/प्रतिनिधी: केंद्र पुरस्कृत आणि राज्य शासनाच्या सहकार्याने सुरू असलेली सूक्ष्म ठिबक सिंचन योजना विविध कारणामुळे शेतकऱ्यांनी भरलेला ऑनलाईन अर्ज निरुपयोगी ठरले आहे. ही योजना अचानकपणे लकी ड्रॉ पद्धतीमध्ये समावेश केल्याने आणि सर्व सहभागी शेतकऱ्यांची नावे न आल्याने खरोखरच हजारो गरजू शेतकरी या  योजनेपासून वंचित राहिले आहे. या योजनेच्या आशेवर काही सहभागी शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. तर काहींनी गरज नसतानाही सहज ऑनलाइनमधून अर्ज केला आहे. अशा शेतकऱ्यांची नावे लकी ड्रॉमध्ये आली आहेत. ही लकी ड्रॉची योजना शेतकऱ्यांना फसवी आणि मृगजळ ठरत असून हजारो गरजू शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे या योजनेची अंमलबजावणी करून निदान यावर्षी तरी सर्वांना "सरसकट" या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोषकुमार पाटील यांनी शासनाकडे केली आहे.

          दुष्काळावर मात करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर वाढवण्यासाठी कृषी विभागाकडून राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कार्यक्रम राबवला जातो. गेल्या सहा वर्षांत या कार्यक्रमातून बहुतांश शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. जत तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सतत दुष्काळी स्थिती निर्माण होत आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत आहेत. मात्र, ठिबक सिंचन करून उपलब्ध पाण्याच्या वापर करत काही शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात केल्याचे तीन वर्षांत दिसून आले आहे. या योजनेनुसार ठिबक सिंचन व तुषार सिंचन साहित्य मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवले जातात.  सन 2021 या चालू वर्षी या सूक्ष्म ठिबक सिंचन योजनेचा समावेश लकी ड्रॉ पद्धतीत समावेश केल्याने आणि या योजनेत ठराविक किंवा मर्यादित लक्षांक असल्याने जत तालुक्यातील काही मोजकेच शेतकऱ्यांची नावे यात आली आहेत. बहुतांश गरजू आणि या योजनेत सहभागी शेतकऱ्याची नावे न आल्याने त्यांच्या या योजनेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वांना सांगून किंवा जाहीर करून लकी ड्रॉ पद्धतीत या योजनेचा समावेश केल्याने ही योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे. या वर्षी लकी ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्याची नावे न ठरवता सरसकट  सर्व सहभागी लाभार्थ्याची नावे या योजनेत सहभागी करून घ्यावे अशी मागणी केली  जात आहे.

         शिवाय पाण्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करून उन्हाळी पिकांसाठी पाणी उपलब्ध राहावे, यासाठी ही योजना लाभदायक आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. ही योजना पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. पण, जनजागृती नसल्याने या योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. शिवाय शेतकऱ्यांना अनेकवेळा शेवटच्या आठवड्यात माहिती मिळते. पण, ऑनलाइन अर्ज पद्धतीमुळे ते योजनेपासून वंचित राहतात. त्यामुळे कृषी विभागाने या योजनेची जनजागृती गावागावात आणि शेतकऱ्यांच्या बांधा-बांधावर जाऊन करण्याची गरज असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments