जतच्या गुंठेवारी व्यवहारात गैरव्यवहार, शेतकरी व ग्राहक कंगाल, एजंट मात्र मालामाल! गुंठेवारी खरेदी-विक्री सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव


जत,प्रतिनिधी: जतचे उपविभागीय अधिकारी यांनी जतची गुंठेवारी जमिन व्यवहार न करण्याच्या सुचना जतचे दुय्यम निबंधक यांना दिल्यानंतर जतमधिल गुंठेवारी जमिनीचे व्यवहार थांबल्याने गुंठेवारी जमिन मालकांची अक्षरशः झोप उडाली असून हे थांबविलेले गुंठेवारी जमिनीचे व्यवहार परत सुरू होण्यासाठी गुंठेवारी इस्टेट एजंट यानी अधिकार्यांच्यावर दबाव आणण्याचे काम सुरू केले आहे. 

           याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत शहरातील जत नगरपरिषद हद्दीतील अनेक इस्टेट एजंटानी येथील स्थानिक शेतकरी यांच्याकडून शेकडो एकर जमिनी खरेदी करून घेऊन त्यावर मोठ्या प्रमाणात प्लाॅटींग केले आहे. या प्लाॅटींगसाठी एजंटानी मोठमोठ्या जाहीराती ही केल्या आहेत. तसेच गुंठेवारी जमिनीच्या खरेदी बरोबरच सातबारा उतारा तयार करून देण्याचे अश्वासन ही या इस्टेट एजंटानी गुंठेवारी जमिन व प्लाॅट खरेदी घेणारे ग्राहक यांना दिले आहे. 

            जत नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात गुंठेवारी प्लाॅट पाडले असून या प्लाॅटींगसाठी इस्टेट एजंटामध्ये मोठी चढाओढ लागली आहे. गुंठेवारी प्लाॅटसाठी इस्टेट एजंटानी अनेक एजंट नेमले असून ते आपल्याच डेव्हलपर्स चे प्लाॅट कसे सोइचे व चांगले आहेत हे ग्राहकांना पटवून देत आहेत. जत शहरातील नगरपरिषद हद्दीत इस्टेट एजंट यांनी पाडलेले गुंठेवारी प्लाॅट हे नियमानुसार नसून या एजंटानी प्लाॅटींगसाठी उपविभागीय अधिकारी जत यांची कोणत्याही प्रकारे परवानगी घेतलेली नाही. तसेच बिगरशेती प्लाॅटींगसाठी जे रस्ते व ओपनस्पेससाठी नियम असतात ते नियम या गुंठेवारी प्लाॅट मालकानी पाळले नाहीत. इस्टेट एजंट यांनी ज्या जमिनीवर प्लाॅटींग केले आहे. त्या संपूर्ण जमिनीचा एकच उतारा निघत आहे. वेगळे गुंठेवारी किंवा चौरस मिटर असा उतारा निघत नाही. त्यामुळे या गुंठेवारी जमिनी खरेदी करणारे ग्राहकांची मोठी लुबाडणूक होत आहे.

          ग्राहकांना जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयात गुंठेवारी जमिनीच्या खरेदी व्यवहारासाठी शेती म्हणूनच जमिन अर्धा गुंठा, एक गुंठा, दिड गुंठा, दोन व तीन गुंठे अशी खरेदी घ्यावी लागत असून यासाठी जमिनीचा सातबारा उतारा, जमिनीच्या गटाचा नकाशा, जमिनीचा झोन दाखला, जमिन खरेदी घेणार याचे नावे सातबारा उतारा किंवा घेणार हे शेतकरी किंवा शेतमजूर असलेचा दाखला जोडून रहिवासी वापरासाठी असलेल्या मिळकती शेतीसाठी म्हणून खरेदी घेत आहेत. यामध्ये गुंठेवारी जमिन खरेदी घेणाराची फसवणूक होत आहे. गुंठेवारी जमिन खरेदी करताना त्यावर जमिनीचे क्षेत्र चौरस मिटर मध्ये टाकता येत नाही. तसेच जमिन जागेचे मोजमाप ही लिहीता येत नाही त्याचप्रमाणे इस्टेट एजंट यांनी तयार केलेला प्लाॅटींगचा नकाशाही सोबत जोडता येत नाही. केवळ अडजेस्टमेंट म्हणून हे गुंठेवारी चे नियमबाह्य व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयात सुरू आहेत. या व्यवहारासाठी दुय्यम निबंधक हे प्रत्येक गुंठेवारी दस्त नोंदणी साठी मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक यांच्या माध्यमातून ग्राहकांची मोठी लुबाडणूक करित आहेत. 

            चार-पाच दिवस झाले जत दुय्यम निबंधक कार्यालयात गुंठेवारी जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारावर उपविभागीय अधिकारी यांनी अंकुश लावला असल्याने गुंठेवारी जमिनीवर प्लाॅटींग करून त्याचे नियमबाह्य व्यवहार करणारे इस्टेट एजंट हादरले असून हे बंद केलेले व्यवहार पुर्ववत सुरू करण्यासाठी ते सबंधित अधिकार्यांच्यावर दबाव आणण्याचे काम करित असून थांबविलेले हे गुंठेवारीचे व्यवहार सोमवारपासून सुरू करण्यात येतील अशी चर्चा जतशहरात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments