बँकांच्या खाजगीकरणाविरोधात दोन दिवसीय संप; जत तहसीलदारांना निवेदन


जत,प्रतिनिधी: केंद्र शासनाने चालवलेल्या वित्तीय व इतर सरकारी संस्थांचे खाजगीकरण रोखण्या बाबत जत मधीक बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारत, बँक खाजगीकरणाला विरोध करणारे निवेदन जत मधील सर्व बँक कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जत तहशीलदारसो याना निवेदन देण्यात आले.

         निवेदनात म्हंटले आहे की, केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेट मध्ये अनेक वित्तीय व निमशासकीय संस्था खाजगी करून सामान्य जनतेचा पैसा, त्यांची आयुष्यभराची जमा पुंजी काही ठराविक उद्योगपतींच्या हाती देण्याचा घाट घातला जात आहे. सामान्य जनतेचे त्यामुळे आर्थिक हित धोक्यात येणार आहे.

         साधारण ५० वर्षापुर्वी गोरगरीब जनतेपर्यंत बँकींग सेवा पोहचविणे, सर्व सामान्य जनतेला सुलभ कर्ज पुरवठा करून त्यांची आर्थिक प्रगती करून सामाजिक समतोल निर्माण करणे, गोरगरीब जनतेची आयुष्यभराची जमापुंजी सुरक्षित ठेवणे, खाजगी सावकारीच्या विळख्यातून गोरगरीब जनतेची सुटका करणे. हा बँकांचा शासकीय करण्याचा उद्देश होता.

         आज ५० वर्षाच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांमुळे गोरगरीब जनता बँकींग सेवांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेताना दिसते. सरकारी बँकांच्या प्रती जनतेची पूर्ण विश्वासर्हता आहे. सामान्य माणूस बँकेकडून कर्ज व इतर सुविधा मिळवत आहे. परंतु खाजगीकरण झाल्यास आजपर्यंत होत आलेल्या सुधारणांना खिळ बसेल व सामान्य जनता आर्थिक बाबतीत प्रवाहाच्या दूर फेकली जाईल. 

         केंद्र व राज्य सरकारकडून गोरगरीब जनतेसाठी व शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना या सरकारी बँकेतून राबविल्या जातात. सरकारी बँकांनी आजपर्यंत सर्व योजनांना १००% यशस्वी करून दाखवले आहे. जसे कोरोना काळात राबविण्यात आलेली ५००/- प्रती महिलांना केंद्राकडून दिलेली मदत बँकांनी आपली सुरक्षितता धोक्यात घालून सर्व सामान्यांपर्यंत पोहचविली. तसेच सरकारी बँका तोट्यात चालत आहे. हा बिनबुडाचा आरोप समोर ठेवला जात आहे. पण कोणतीही सरकारी बँक तोट्यात चालत नाही. म्हणून सामान्य जनतेचे हित व त्यांच्या पैशांची सुरक्षितता अबाधित राखण्याच्या दृष्टीने आम्ही बँक खाजगीकरणाचा विरोध करत आहोत. असे जत मधील बँकर्सनि निवेदनात म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments