येळदरी येथे घरास आग, सुमारे दहा लाखाचे नुकसान । कोणतीही जीवित हानी नाहीजत,प्रतिनिधी: येळदरी मानेवस्ती ता.जत येथे शुक्रवारी दुपारी झोपडीवजा कुडाचे घरास आग लागून झालेल्या नुकसानीत सिद्राम माने कुटूंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. या आगीत संसारपयोगी साहित्य, रोख रक्कम, तीन तोळे सोने, शेळी, दोन कोकरु, एक दुचाकी जळून खाक झाली आहे. सुमारे दहा लाखाचे नुकसान झाल्याने माने कुटुंब उघड्यावर पडले आहे. 

       येळदरीपासून एक किलोमीटर अंतरावर बिळूर रोडला माने वस्ती आहे. या वस्तीवर सिद्राम माने हे पत्नी व दोन मुली, एका मुलासह राहतात. त्याची द्राक्षाची बाग आहे. माने वस्तीवर झोपडीवजा कुडाचे घर आहे. शुक्रवारी दुपारी माने पती, पत्नी हे जेवण करण्यासाठी घरी आले. जेवण झाल्यानंतर कुडाच्या घरातील झोपडीतील चुलीवर दूध तापवण्यास ठेवून माने पती-पत्नी बागेत निघून गेले. दुपारी वारा सुटला होता. वाऱ्याने चुलीतील विस्तू उडून कुडाने पेट घेतला. याच झोपडीवजा घराला लागून मोटर सायकल होती. या मोटर सायकलमध्ये पाच लिटर पेट्रोल होते तर बागेसाठी जे डिझेल आणले होते तेही मोटार सायकलला अडकवले होते. काही कळायच्या आत मोटार सायकलला लावलेल्या डिझेल तसेच गाडीतील पेट्रोलमुळे अचानक आगीने रौद्ररूप धारण केले व क्षणात झोपडीने पेट घेतला. ही बाब लक्षात येताच शेजारील लोकांनी व ग्रामस्थांनी धाव घेत माने यांच्या तिन्ही मुलांना प्रथम बाहेर काढले त्यानंतर घरातील गॅस सिलेंडरही बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

Post a Comment

0 Comments