चिकलगी भुयार येथे तुकाराम बीज उत्साहात साजरी । बीज निमित्य मास्क व सॅनिटायझरचे वाटपजत/प्रतिनिधी: चिकलगी भुयार मठ येथे सोशल डिस्टन्सचे पालन करत तुकाराम बीज उत्साहात साजरी करण्यात आली. चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत बीज साजरी करण्यात आली. 'कोरोना हद्दपार होवू दे'  असे साकडे यावेळी पांडुरंगाला तुकाराम बाबा महाराज व भाविकांनी घातले. 

      ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस... वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे आज तुकाराम बीज आहे. म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले. संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे निर्भीड कवी होते. समाजाच्या तळागाळातील लोकांनाही सहज उमजतील, अशा संतरचना तुकारामांनी केल्या. श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतांत गेलेले हे दोन्ही अवतार होते; परंतु, मानव असूनही सदेह वैकुंठगमनाचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकमेव होते.

        मंगळवेढा तालुक्यातील चिकलगी भुयार मठ येथे श्री संत तुकाराम महाराज बीज उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज व भाविक भजनात रंगून गेले होते. भजनानंतर भुयार मठ येथे दुपारी बारा वाजता फुले टाकण्याचा कार्यक्रम पार पडला. फुले टाकण्याचा सोहळा पार पडल्यानंतर चिकलगी भुयार मठ येथे छोटेखानी दहीहंडी फोडून बिजेची सांगता चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केली.

 मास्क व सॅनिटायझरचे वाटप-

तुकाराम बीजसाठी भुयार मठ येथे आलेल्या भाविकांना मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

 कोरोनाच्या हद्दपारीसाठी पांडुरंगाला घातले साकडे-

सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज बीज साधेपणाने साजरी केली जात आहे. आजही जगावर कोरोनाचे जीवघेणे संकट कायम आहे. या संकटांवर मात करण्यासाठी मनाची एकाग्र शक्ती व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन यावेळी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केले.

Post a Comment

0 Comments