मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यूजत,प्रतिनिधी: जत शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या बिरनाळ ता. जत येथील साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण विनायक वसंत कलाल (वय २० रा.संभाजी चौक जत) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधुवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली, याप्रकरणी जत पोलीसात प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे, परंतु मृतदेहाचा शोध अद्याप लागला नाही.

          याबाबत अधिक माहिती अशी की, विनायक कलाल व त्याचे मित्र सागर कोळी वय २२ रा. विठ्ठल नगर जत, मयूर संतोष भद्रे वय २१ रा. संभाजी चौक जत, विनायक शाम ननवरे वय २० रा. शिवाजी चौक जत, सागर सिद्राया भंडारे वय २० रा. रोहिदास नगर जत, अभिषेक अर्जुन जमदाडे वय २२ रा. मंगळवार पेठ जत हे सर्वजन आज दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान घरातून पोहण्यासाठी बिरनाळ साठवण तलावात गेले होते. त्यापैकी सागर कोळी, मयूर भद्रे, विनायक ननवरे यांना काही प्रमाणात पोहण्यासाठी येत होते. तर सागर भंडारे, अभिषेक जमदाडे व विनायक कलाल यांना पोहण्यासाठी येत नव्हते. विनायक कलाल हा दगडावर पाण्यात उभा होता व पोहण्याचा प्रयत्न करत होता. त्या दरम्यान त्याचा पाय दगडावरून अचानक घसरून तो पाण्यात पडून बुडू लागला यावेळी सागर कोळी यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला आसता, विनायक यांनी सागर यांना पाण्यातच अचानक मिठी मारली त्यामुळे सागर यांनी घाबरून विनायकला बाजूला केले व तो स्वतः बाजूला पोहत आला. विनायक याला पोहण्यासाठी येत नसल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे.

         विनायक कलाल हा जत ते शेगाव रस्त्यावरील एम के गॅरेज, सैनिक नगर जत येथे मेकॅनिकल म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सांगली येथून विनायक कलाल याचा मृतदेह बिरनाळ साठवण तलावातून बाहेर काढण्यासाठी दोन पथके मागवण्यात आले आहे. परंतु रात्री उशिरापर्यंत ते आले नव्हते. आज सकाळी  ९ वाजता आपत्ती व्यवस्थापनची पथके घटना स्थळी दाखल झाली आहेत. परंतु अद्याप मृतदेहाचा शोध लागला नाही.

          घटनास्थळी तहसीलदार सचिन पाटील, पोलिस निरीक्षक उत्तम जाधव व इतर शासकीय अधिकारी व कर्मच्याऱ्यानी भेट देऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments