बेकायदा मोबाईल टॉवरचे काम बंद पाडले जतमधील प्रकार; पालिकेचा परवाना बोगस असल्याचा आरोप


जत, प्रतिनीधी: शहरातील रामराव नगरमध्ये बेकायदेशीरपणे उभे करण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरचे काम भाजपचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी बंद पाडले. माजी आमदार विलासराव जगताप यांनी हे काम बेकायदेशीर असून नगरपालिकेचा ना हरकत परवाना बोगस असल्याचा आरोप केला. याबाबत प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी तूर्त या कामास स्थगिती दिली आहे. पोलिस बंदोबस्तात सुरू असलेले काम बंद पाडण्यात आले. नंतर प्रांताधिकारी यांच्या दालनात बैठक झाली. प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. टॉवर उभारणीसाठी बिगर शेती, वाणिज्य परवाना घेतला नसल्याचे सांगितले. तक्रारीनुसार ना हरकत परवान्याची चौकशी करण्याच्या सूचना तहसीलदार सचिन पाटील यांना दिल्या.

        टॉवर उभारन्यात येत असलेल्या परिसरातील रहिवाशांना सौर उर्जा व गोबर गॅस प्लांट उभा करीत असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात उभारणीसुरू झाल्यानंतर येथील नागरिकांनी विरोध केला. बनावट सह्या, शिक्क्यांचा वापर व अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून काही जण पालिकेचे ना हरकत दाखले देतात. तसेच कर भरल्याच्या बोगस पावत्याही दिल्या जातात अशा तक्रारी आहेत. असे बोगस दाखले व पावत्या देणारी टोळी जत नगर पालिकेत कार्यरत असल्याचीही तक्रार केली जात आहे. सहा महिन्यापूर्वी असेच बोगस सही-शिक्के आढळल्याने पालिका प्रशासनाने जत पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

माजी आमदार विलासराव जगताप, नगरसेवक उमेश सावंत, सामाजिक कार्यकर्ते गौतम ऐवळे, नगरसेवक प्रकाश माने, सोनू जाधव, कुमार केळी, यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments