केंद्र सरकारच्या जाचक धोरणाविरोधात जत तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन । बीजेपी सरकार भांडवलदारांना सांभाळण्यासाठी कृषी कायदे पाठीमागे घेत नाही; आमदार विक्रमसिंह सावंत


जत,प्रतिनिधी: जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विरोधी काळे कायदे व महागाई विरोधात केंद्र सरकारला जागे करण्यासाठी जत तालुका काँग्रेसच्या वतीने भारत बंद ला पाठिंबा देण्यात आला व केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, माजी पं.स.सभापती बाबासाहेब कोडग, जत काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय शिंदे, सांगली जिल्हा obc सेल्स अध्यक्ष तुकाराम माळी, जत युवक काँग्रेस अध्यक्ष विकास माने, नगरसेवक भुपेंद्र कांबळे, जत शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश बनसोडे, विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज निकम, मोहन माने पाटील व सर्व पदाधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

         भारत हा कृषिप्रधान देश आहे, असे आपण म्हणत असलो तरी शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार करत आहे. देशात मागील सात वर्षापासून भाजपची सत्ता आहे. परंतु सतत शेतकऱ्याच्या विरोधात केंद्र शासन निर्णय घेऊन त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केला. जत येथील श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार परिसरात केंद्र सरकारने कृषी कायदे पाठीमागे घ्यावेत व भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

         दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांवर केंद्र सरकारने पाणी मारून लाठीचार्ज केला आहे. सदरची घटना दुर्दैवी आहे, असे मत व्यक्त करून आमदार सावंत पुढे म्हणाले की, डिझेल, पेट्रोल व शेतकरी हमीभाव याचे भांडवल करून केंद्र सरकारने देशात सत्ता मिळवली आहे. परंतु याचे भाव गगनाला भिडले असले तरी याचा त्यांना आता विसर पडला आहे. केंद्र सरकार महागाई विरोधात बोलण्यास तयार नाही. टोलवसुली व जीएसटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वसुली करत आहे. परंतु विकास होताना दिसत नाही. तसेच बीजेपी सरकार भांडवलदारांना सांभाळण्यासाठी कृषी कायदे पाठीमागे घेत नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. तालुका काँग्रेस कमिटी अप्पाराया बिराजदार, नगरसेवक भुपेंद्र कांबळे, माजी सभापती बाबासाहेब कोडग, मोहन माने पाटील, तुकाराम माळी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments