सोरडी येथे गावकामगार तलाठी याना मारहाण; ११ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल


जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील सोरडी येथे गावकामगार तलाठी बाळासाहेब शंकर जगताप (वय ५३ रा. जत) हे सोरडी येथील चाबरे वस्ती येथे बेकायदेशीर वाळू साठ्याचा फोटो काढून पंचनामा करण्यासाठी गेले असता येथील वाळू तस्कर व सुमारे ११ पुरुष आणि महिलानी त्यांना काठी व दगडाने मारहाण करून, विळ्याने डाव्या हाताच्या करंगळीवर वार झाल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. उपचारार्थ त्यांना सांगली येथे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बाळासाहेब जगताप यांनी ११ जणांच्या विरोधात जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान सोरडी येथील चाबरे वस्ती येथे घडली आहे.

         याबाबत अधिक माहिती अशी की, गावकामगार तलाठी बाळासाहेब जगताप हे स्वतःच्या चारचाकी गाडीतून चाबरे वस्ती येथे बेकायदेशीर वाळूचा साठा करण्यात आला आहे. याची माहिती मिळाल्यानंतर फोटो काढून पंचनामा करण्यासाठी एकटेच गेले होते. जगताप आले आहेत, याची माहिती मिळाल्यानंतर तेथील नागरिकांनी आरडाओरड करून सर्वांना एकत्र केले होते. लक्ष्मण पुतळाप्पा चाबरे व त्यांच्या दोन पत्नी आणि दोन मुले, मनगेनी पुतळाप्पा चाबरे, गौराबाई पुतळाप्पा चाबरे, राहुल लक्ष्मण चाबरे, विकास मनगेनी चाबरे, राजू मनगेनी चाबरे , बिरा शंकर चाबरे सर्व रा. चाबरे वस्ती सोरडी ता. जत यांच्याविरोधात जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

        वाळू तस्करांनी व त्यांच्या नातेवाईकांनी गावकामगार तलाठी बाळासाहेब जगताप यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याच्या निषेधार्थ जत तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ भोसले करत आहेत.


Post a Comment

0 Comments