येळदरीत घरास आग मानव मित्र संघटना धावली मदतीला । रोख रक्कम, संसारपयोगी साहित्याची केली मदत


जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील येळदरी येथील सिद्राम माने यांच्या झोपडीवजा घरास शुक्रवारी आग लागून झालेल्या नुकसानीत मोरे कुटूंब उघड्यावर पडले. या घटनेची माहिती मिळताच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना तात्काळ माने कुटूंबियांच्या मदतीला धावून आली. माने कुटूंबियांना श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी धीर देत मानव मित्र संघटनेच्या वतीने रोख रक्कम व संसारपयोगी साहित्य देत मदतीचा हात दिला. या मदतीने माने कुटूंबिय गहिवरून आले. ऐनवेळी मिळालेली ही मदत लाख मोलाची असल्याचे सांगत त्यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली.

          शुक्रवारचा दिवस येळदरी येथील माने कुटूंबियांसाठी घातवार ठरला. कष्टाने उभारलेला संसार डोळ्यादेखत जळून खाक झाला. येळदरीपासून एक किलोमीटर अंतरावर बिळूर रोडला माने वस्ती आहे. या माने वस्तीवर सिद्राय्या माने हे पत्नी व दोन मुली, एका मुलासह राहतात. त्याची द्राक्षाची बाग आहे. माने वस्तीवर झोपडीवजा कुडाचे घर आहे. शुक्रवारी दुपारी माने पती, पत्नी हे जेवण करण्यासाठी घरी आले.  जेवण झाल्यानंतर कुडाच्या घरातील झोपडीतील चुलीवर दूध तापवण्यास ठेवून माने पती-पत्नी बागेत निघून गेले. दुपारी वारा सुटला होता. वाऱ्याने चुलीतील विस्तू उडून कुडाने पेट घेतला. याच झोपडीवजा घराला लागून मोटर सायकल होती. या मोटर सायकलमध्ये पाच लिटर पेट्रोल होते तर बागेसाठी जे डिझेल आणले होते तेही मोटार सायकलला अडकवले होते. काही कळायच्या आत मोटार सायकलला लावलेल्या डिझेल तसेच गाडीतील पेट्रोलमुळे अचानक आगीने रौद्ररूप धारण केले व क्षणात झोपडीने पेट घेतला. ही बाब लक्षात येताच शेजारील लोकांनी व ग्रामस्थांनी धाव घेत माने यांच्या तिन्ही मुलांना प्रथम बाहेर काढले त्यानंतर घरातील गॅस सिलेंडरही बाहेर काढला.

  • माने कुटूंबीय हे गरीब कुटूंब आहे. बागेवरच त्यांच्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालत होता. या आगीत संसारपयोगी साहित्य, रोख रक्कम, तीन तोळे सोने, शेळी, दोन कोकरु जळून खाक झाल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले होते. ही बाब समजताच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी धीर देत मानव मित्र संघटनेच्या वतीने रोख रक्कम व संसारपयोगी साहित्य देत मदतीचा हात दिला. यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, सूरज मणेर, विक्रम कांबळे, अमोल कुलकर्णी, तुकाराम बंडगर, शिवाजी देवकते, बाबा शिंदे, संभाजी सरगर, राजेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments