जत ग्राहक पंचायत व तहसील कार्यालय यांच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा


जत,प्रतिनिधी: जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने जत तहसील कार्यालय येथे ग्राहक पंचायत जत व तहसील कार्यालय यांच्या वतीने  जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी तहसिलदार सचिन पाटील, ग्राहक पंचायत पुणे विभागाचे उपाध्यक्ष डॉ विद्याधर किट्टद, ग्राहक पंचायत जतचे अध्यक्ष मनोहर पवार व कामगार सेनेचे नेते दिनकर पतंगे यांनी उपस्थिथांना मार्गदर्शन केले. 

       यावेळी डॉ विद्याधर किट्टद म्हणाले की, ग्राहकांचे हक्क व अधिकार याबाबत अमेरीकेत सर्वप्रथम 1962 साली कायदा करण्यात आला. अमेरिकी काँग्रेसमध्ये 15 मार्च 1962 मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकारांबद्दल भाषण केले होते. ग्राहक हक्कांबद्दल भाष्य करणारे ते पहिले नेते ठरले होते. ग्राहक हक्कांची चळवळ चालवणाऱ्या नागरिकांनी 1983 मध्ये पहिल्यांदा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक ग्राहक दिन हा आतंरराष्ट्रीय पातळीवर 15 मार्चला साजरा केला जातो.

       तहसिलदार सचिन पाटील म्हणाले की, भारत सरकारने 1986 साली संसदेमध्ये ग्राहकांचे हक्क व अधिकार याबाबत कायदे करण्यात आले. यासाठी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील ग्राहक न्यायालयाची स्थापना करण्यात आली असून यामाध्यमातून ग्राहकाला न्याय मिळवून दिला जातो. अलिकडे 2019 साली संसदेमध्ये यामध्ये दुरुस्ती व बदल करून जास्तीत जास्तं पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

        या कार्यक्रमाला तिंकोडीचे सरपंच बसवराज पाटील, प्रा तुकाराम सन्नके, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्राहक पंचायतीचे सदस्य उपस्थित होते.  कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनोहर पवार यांनी तर आभार पुरवठा अधिकारी गोठनेकर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments