मराठी ही समृद्ध भाषा: डॉ. विद्याधर किट्टद । जत बस आगारात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा


जत/प्रतिनिधी : मराठी भाषेची प्राचीनता, तिचे विविधांगी प्रवाह, व्यापकत्व, वाड्‌मयनिर्मिती, तिच्या बोलीभाषा या अंगाने भाषेचा विचार होताना भाषेचे सौंदर्य, सौष्ठव, माधुर्य, रसाळता आणि लोकमानसात स्थिरावलेली तिची रूपे यांचा विचार होणे फार महत्त्वाचे ठरते. एका अर्थाने भाषा हीच संस्कृतीची वाहक असते. ज्ञानगंगेचा प्रवाह अखंड चालू ठेवण्याची कामगिरी भाषेलाच करावी लागते. वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास भाषा हे केवळ समाजव्यवहाराचे नाही, तर विचारांचेही साधन आहे. बोलीभाषांसारखे अनेक प्रवाह, इतर विविध भाषांमधील शब्द मूळ भाषेला येऊन मिळतात आणि भाषा समृद्ध होते. त्या भूमिकेतून मराठी भाषा समृद्ध आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ विद्याधर किट्टद यांनी व्यक्त केले. ते ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा जत व जत बस आगार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे उपस्थित होते.


         आपले मनोगत व्यक्त करताना ग्राहक पंचायत जतचे अध्यक्ष मनोहर पवार म्हणाले, " मराठी भाषा महाराष्ट्रासह अनेक राज्यांत व जगभरातील विविध देशांच्या कानाकोपऱ्यात बोलली जाते. त्या अर्थाने मराठी ही जागतिक भाषा म्हणून भविष्यात ओळखली जाईल. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक तेजस बुचडे, अशोक जेऊरकर, प्रा तुकाराम सन्नके, नामदेव बेळ्ळे, विजय निंगणुर, मोहसीन इनामदार, दिलीप व्हनखंडे, आगार अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व प्रवासी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा तुकाराम सन्नके यांनी तर नामदेव बेळ्ळे यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments