आ.विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त माळरान कृषी प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन । राज्यपाल हा विक्षिप्त माणूस आहे ! मंत्री यशोमती ठाकूर यांचा कोश्यारींवर हल्लाबोलजत/प्रतिनिधी: आमदार विक्रमसिंह सावंत व विक्रम फाउंडेशन यांच्या वतीने आ. विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त माळरान कृषी प्रदर्शन व कृषी सन्मान सोहळा जत येथे आयोजित करण्यात आला होता. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अँड. यशोमती ठाकूर आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना त्या म्हणाल्या की, जत येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी शासनाकडून कोणतेही अडचण निर्माण होणार नाही. परंतु राज्यपाल अडचण आणत आहेत. तो विक्षिप्त माणूस आहे, त्यामुळे कृषी महाविद्यालयाला मान्यता देण्यासाठी विलंब होत आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच जत तालुक्याच्या शेजारी धोका देणाऱ्यांचे राज्य आहे. परंतु जत तालुक्यात पाणी आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आमचे कोण ऐकत नाही ते बघून घेऊ असे सांगून अँड. यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या अंगणवाडीचेे बळकटीकरण करणार आहे. सेविकांचे पगार वेळेवर करण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे.

          कर्नाटक राज्यातून प्रायोगिक तत्त्वावर जत तालुक्यात पाणी आणू परंतु शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणणारे सरकार तेथे आहे. नवतेजस्विनी ही नवीन योजना महाविकास आघाडी शासनाने तयार केला आहे. येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत त्यास अंतिम स्वरूप देऊन मान्यता घेण्यात येणार आहे. जत तालुक्यासाठी एक कींवा दोन्ही नवतेजस्विनी योजना मंजूर करण्यात येतील असे आश्वासन देऊन त्या पुढे म्हणाल्या की, जत तालुका आम्ही दत्तक घेतला आहे. जी मागणी कराल त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आणि कटीबद्ध आहोत. अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

        कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यावेळी बोलताना म्हणाले की, राज्यात कोणत्याही तालुक्यात दुष्काळी परिस्थिती राहणार नाही असा शासनाचा निर्धार आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्राधान्यक्रम देणार आहे. बाजारात मागणी असेल तेच पीक शेतकऱ्यांनी घ्यावे त्यानंतर त्यांना इतरांच्या कुबड्या व कर्ज घेणे आणि कर्जमाफीची गरज लागणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.   

        कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यावेळी बोलताना म्हणाले की, जत ही माझी मातृभूमी आहे. दुष्काळाची झळ मी जवळून पाहिली आहे. परंतु त्याचा त्रास येथील जनतेला मागील अनेक वर्षे सहन करावा लागत आहे. पाणी असेल तर उत्तम व चांगली शेती करता येते. पाणी आल्यानंतर जत तालुक्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून निघेल असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची महाविकास आघाडी आसली तरी जत तालुक्यातील मित्र पक्ष लग्न एकाशी आणि संसार दुसर्‍याशी करत आहेत. असा टोला कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी जत तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव न घेता यावेळी बोलताना लगावला.

        आमदार विक्रम सावंत यावेळी बोलताना म्हणाले की, पाणी हा जत तालुक्याच्या जिव्हाळ्याचा व जीवन-मरणाचा प्रश्न आहे. सहजासहजी जेथून पाणी येईल तेथून मिळावे यासाठी शासन दरबारी माझा सतत पाठपुरावा सुरू आहे. मागील वर्षात म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना पूर्ण झाली आहे. त्यामुळे सध्या फक्त १० ते ११ टक्‍के क्षेत्र ओलिताखाली आले आहेत. विस्तारित उपसा सिंचन योजनेमुळे आणखी दहा-पंधरा वर्षे वाया जाणार आहेत. तसे होऊ नये यासाठी माझी शासनाला विनंती आहे. पूर्वभागातील ५२ गावे पाण्यापासून अद्याप वंचित आहेत. पैसे भरून शेतकऱ्यांना पाणी घ्यावे लागत आहे. पावसाळ्यात आमचे साठवण तलाव भरून दिले तर उन्हाळ्यात आम्हाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही. जत तालुक्याचे विभाजन करण्याऐवजी त्रिभाजन करून येथील जनतेची होणारी गैरसोय कमी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

         यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पराय बिराजदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते, माजी सभापती बाबासाहेब कोडग, जत नगरपालिका नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवार, मीनल सावंत, मारुती पवार, अँड. युवराज निकम, गणेश गिड्डे, अतुल मोरे, परशुराम मोरे, निलेश बामणे, प्रदीप नागने, भुपेंद्र कांबळे उपस्थित होते. इराण्णा निडोणी यांनी आभार मानले. 

Post a Comment

0 Comments