जत नगर परिषदेची वार्षिक अर्थसंकल्पीय सभा तहकूब; सभेस मुख्याधिकारीच गैरहजर


जत/प्रतिनिधी: जत नगरपरिषद वार्षिक सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.शुभांगी बन्नेनवर, उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, गटनेते साहेबराव कोळी, स्वप्नील शिंदे, सभापती सौ.गायत्रीदेवी शिंदे, सौ.भारती जाधव, सौ.बाळाबाई मळगे, शिक्षण सभापती प्रकाश माने, गटनेत्या सौ.श्रीदेवी सगरे, नगरसेविका सौ.कोमल शिंदे, नगरसेवक इराण्णा निडोनी व नगरपरिषदेचे वरीष्ठ कर्मचारी उपस्थित होते.
     यावेळी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. यावर नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी आक्षेप घेतला. मुख्याधिकारी मनोज देसाई हे रजेवर असले तरी त्यांच्या जागी तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांची नेमणूक केली असताना ते सुद्धा गैरहजर राहिले, त्यामुळे ही सभा तहकूब करावी अशी मागणी नगरसेवक कांबळे यांनी केली. तर आतापर्यंत जत शहरात किती मोबाईल टॉवरला मान्यता दिली, किती कर वसूल केला याची माहिती द्या. नगरसेवकांची तुम्ही चेष्टा सुरू केली आहे काय? महत्वाची बैठक असताना अधिकारी हे मुद्दामच गैरहजर राहतात. यापेक्षा अधिकाऱ्यांना कधी वेळ आहे, ते ठरवून बैठक घ्या. उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्याना नोटीस काढन्याचे आदेश दिले. उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपनाचा निषेध केला. तर विरोधी पक्षनेते विजय ताड यांनी कोरम अभावी सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली आहे. नगरपरिषदेमध्ये ठराविक नगरसेवकांचा मनमानी कारभार असल्याचा आरोप केला. २६ फेब्रुवारीच्या सभेत मानी ठराव घुसडले आहेत. ठेकेदाराला जोपासण्याचे काम सुरू आहे. शहराच्या विकासासाठी आत्तापर्यंत ३०० ठराव घेतले असून त्यातील एकाही ठरावाची अंमलबजावणी झाली नाही. येणाऱ्या काळात शहराच्या विकासासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा ताड यांनी दिला. आजच्या बैठकीला ठराविक नगरसेवकांच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभेला गैरहजर राहिल्याचे ताड यांनी सांगितले.

जत नगरपरिषदेच्या सन २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी विशेष बैठक बोलवली होती. यावेळी विरोधी पक्ष नेते विजय ताड याच्या समवेत बहुतांश नगरसेवक उपस्थित नसल्याचे दिसून आले. एकंदरीत विजय ताड यांनी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांची मोट बांधल्याची जत शहरात चर्चेला उधाण आले आहे.

Post a Comment

0 Comments