जत्रा, यात्रा, उरूस भरविण्यास मनाई । फक्त धार्मिक विधी करण्यास परवानगी- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली: सांगली जिल्ह्यातील धार्मिक यात्रा, जत्रा उरूस यामधील फक्त धार्मिक विधी करण्यास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परवानगी दिली असून जिल्ह्यात जत्रा, यात्रा, उरूस भरविण्यास मनाई केली आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांनी ज्या ठिकाणी धार्मिक विधी होणार आहे त्या ठिकाणचे पर्यवेक्षण करून नियंत्रण ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.

राज्य शासनाकडील निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 29 जानेवारी च्या आदेशान्वये सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्य शासनाकडील दि. 14 नोव्हेंबर 2020 च्या आदेशान्वये व जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 15 नोव्हेंबर 2020 च्या आदेशान्वये जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व उपासना स्थळे सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आलेली आहेत. त्यामुळे यात्रा, जत्रा, उरूस भरविण्यासाठी अर्ज प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सद्यस्थितीत कोविड-19 च्या रूग्ण संख्येत वाढ होत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी वरीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्था, संबंधित पोलीस अधिकारी यांनी करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments