जत तालुका श्री दान्नमादेवी दुध उत्पादक संघाची स्थापना; शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर व न्याय मिळवून देणार; आमदार विक्रम सावंत


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर व न्याय मिळवून देण्यासाठी श्री दान्नमादेवी जत तालुका दुध उत्पादक संघाची स्थापना करून त्याला शासनाकडून रजिस्टर नोंदणी प्रमाणपत्र मिळवून घेतले आहे. येत्या 21 फेब्रुवारी रोजी जत येथे दूध संकलन केंद्र व चीलिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराय बिराजदार, दूध संघाचे उपाध्यक्ष महादेव दुधाळ, सचिव एड युवराज निकम, संचालक अतुल मोरे उपस्थित होते.

         सन 1985 पासून अनेक नेत्यांनी जत तालुक्यात दूध संघ स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्याना यश आले नाही, त्यामुळे जत तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा असूनही तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर व न्याय मिळत नव्हता. त्यामुळे आम्ही तालुका दुध संघ स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून त्याला मान्यता मिळवून घेतली आहे. या दूध संघात 21 जणांचे संचालक मंडळ असून, तालुक्याच्या विविध भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना सवलती व शासकीय योजनेचा फायदा मिळवून देऊन. जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. येत्या 21 फेब्रुवारी रोजी प्राथमिक स्वरूपात दूध संकलन केंद्र सुरू करून दररोज सुमारे सरासरी दहा हजार लिटर दूध संकलन होईल असा आत्मविश्वास व्यक्त करुन आमदार विक्रम सावंत पुढे म्हणाले की, या दूध संघाच्या माध्यमातून तालुक्यातील सुमारे 50 तरुण बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील सहकारी संस्था व दूध संकलन केंद्र यांच्याशी संलग्न राहून तेथील दूध तालुका दूध संघाकडून संकलित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दूध संघाचे कार्यक्षेत्र जत तालुका मर्यादित स्वरूपात राहणार असून, येथे संकलित झालेले दूध कात्रज डेअरी पुणे किंवा जरशी डेरी हैदराबाद येथे घालण्या संदर्भात चर्चा सुरू आहे. अद्याप त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले नाही. संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन चर्चा करून त्या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल असेही विक्रम सावंत यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments