जत मध्ये गुंठेवारीची नियमबाह्य खरेदी-विक्री; प्रांत अधिकाऱ्यांचे निबंधकांना गुंठेवारी खरेदी-विक्री बंदच्या सूचना । इस्टेट एजंटांचे धाबे दणाणले


जत/प्रतिनिधी: जत नगरपरिषद हद्दीतील जमीनी प्लाॅटचे खरेदी - विक्री व्यवहार करताना जमिनीच्या गुंठेवारी व्यवहारासाठी उपविभागीय अधिकारी यांची परवानगी न घेता व्यवहार सुरू असल्याने व या व्यवहाराची नोंद सातबारा उतारा सदरी नोंदविणेकामी तलाठी व मंडलअधिकारी हे मोठ्या प्रमाणात पक्षकारांची लुबाडणूक करित असल्याने, सबंधित गुंठेवारीचे नियमबाह्य व्यवहार न नोंदविण्याच्या सुचना उपविभागीय अधिकारी जत यानी जतचे दुय्यम निबंधक यांना बोलावून दिल्याने, जत शहरात मोठी खळबळ माजली असून गुंठेवारी जमिन व प्लाॅटचे नियमबाह्य व्यवहार करणारे इस्टेट एजंट यांना हादरा बसला आहे. 

          या बाबत सविस्तर माहिती अशी की, जत शहरातील नगरपरिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात जमिनीचे गुंठेवारी पध्दतीने प्लाॅट पाडून त्याचे व्यवहार सुरू आहेत. जत शहरातील जमीनीचे प्लाॅट चे व्यवहार जमिन बिगरशेती न करता गुंठेवारी पध्दतीने सुरू आहेत. शहरातील ज्या जमिनीवर बिगरशेती करून शासकीय नियमानुसार प्लाॅट पाडले आहेत. त्या ठिकाणी नियमानुसार रस्ते व खुली जागा असे रेखांकण केले आहे. त्याच प्रमाणे सदर जागेची उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालय जत यांच्याकडून मोजणी ही करून घेतली आहे. त्याचप्रमाणे सबंधित जागेचा संपूर्ण अराखडा व रेखांकण नगररचना सांगली विभागांकडून मंजूर करून घेतला असून प्लाॅट चे स्वतंत्रपणे सातबारा उतारे तयार झाले आहेत. 

          परंतु ज्या इस्टेट एजंटनी शेती जमिनीवर गुंठेवारी पध्दतीने प्लाॅट पाडून त्याची विक्री सुरू केली आहे. त्या जमिनी या शेतीविभागात तसेच श्री. यल्लमादेवी यात्रेसाठी अरक्षित केलेल्या जमिनी असून याची कल्पना गुंठेवारी प्लाॅट खरेदी घेणारेंना नसल्याने त्यांची भविष्यात मोठी फसवणूक होणार आहे. या जमिनी या शेतीविभागात असल्याने या जमिनीचे बिगरशेती होत नाही. म्हणून या जमिनीवर इस्टेट एजंटाकडून अर्धा गुंठा, एक गुंठा, दिड गुंठा, दोन गुंठे, असे पाचगुंठेपर्यंत गुंठेवारी प्लाॅट पाडून त्याची नियमबाह्य खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत.

         जत दुय्यम निबंधक कार्यालयात सबंधित गुंठेवारी व्यवहारासाठी शेतीचा सातबारा व खातेउतारा तसेच गटाचा नकाशा, शेतजमिन घेणारा शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील तसेच शेतमजूर असलाचा दाखला इतकी कागदपत्रे जोडून दुय्यम निबंधक यांना गुंठेवारी दस्त नोंदणीकामी दस्तामागे पंधराहजार रूपये देऊन दस्त नोंदणी चे कामकाज सुरू होते. परंतु गुंठेवारी जमिनीचे व्यवहार करण्यापूर्वी सबंधित जमिनीचे रेखांकण तसेच रस्ते व ओपणस्पेस यासाठी सबंधित इस्टेट एजंट हे नियमानुसार रेखांकण करित नसल्याने गुंठेवारी जमिनी खरेदी करणारांची फसवणूक होत आहे. 

         त्याचप्रमाणे गुंठेवारी जमिनी खरेदी करताना खरेदी दस्तऐवजामध्ये शेतजमिन म्हणून तसेच यात जागेचे मोजमाप नसल्याने त्याचप्रमाणे प्लाॅट चा नंबर नसल्याने जागा खरेदी घेणार हा शेतीसाठीच जागा विकत घेत आहे असे समजले जाते. त्यामुळे भविष्यात शेतीसाठी जागा खरेदी करून तीचा वापर रहिवासी कारणासाठी करताना खरेदी घेणारेपुढे अडचणी निर्माण होणार आहेत. तसेच जागेबाबाबत वादही निर्माण होण्याची शक्यता आहे. 

         जत नगरपरिषद हद्दीतील दस्त बिनशेती परवानगी सक्षम प्राधिकारी यांची नसताना व बेकायदेशीर रेखांकण मंजूर नसताना बिनशेती प्लाॅटींगचे तुकडेबंदी कायदेविरूध्द नोंदी प्रमाणीकरण तसेच शासननिर्णय मुंबईचा धारणा जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम १९४७ मधील कलम ९ ची सुधारणा महाराष्ट्र राजपत्र दि.७ सप्टेंबर २०१७ व दि.३ जानेवारी २०१८ नुसार नजराणा रक्कम २५ टक्के भरून करणे अपेक्षीत आहे. त्यामुळे सबंधित दस्ताच्या नोंदी घालतेवेळी मंडलअधिकारी यांनी शासनाचा महसुल बुडविलेची चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments