जत वन विभागाच्या हद्दीतील जळीत वृक्षांबाबत अद्याप कारवाई नाही । प्रकरण दडपण्याचा प्रयत्न


जत(जॉकेश आदाटे): जत तालुक्यातील व्हसपेट, बिरनाळ, तिप्पेहळी, जत अंबाबाई मंदिर परिसर, जत उमराणी रोड तसेच वन विभागाच्या कार्यालयामागे असलेल्या वन विभागाच्या हद्दीतील आज्ञाताकडून लागलेल्या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली होती. या सर्व प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी अनेक वण्यप्रेमींनी केली होती. मात्र अद्याप याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. जिल्हा प्रशासनही या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप केला जात आहे.

        जत तालुक्यातील एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत ११ हजार ३६३ हेक्टर इतके वनक्षेत्र आहे. केवळ पाच टक्के वनक्षेत्र असले तरी तालुक्यातील वन्यजीवन संपन्न आहे. जत जवळील अंबाबाई मंदिर परिसरात वन पर्यटन केंद्र स्थापन करून त्या ठिकाणाचा विकास करण्यात आला आहे. व्हसपेठ, कोळगिरी, खलाटी याठिकाणी अधिक प्रमाणात वन्यजीवन आहे. डोंगर-दर्‍या, झाडी, दुर्गम ठिकाणी अनेक प्रजातींचे वास्तव्य आहे.


       जत शहरातील इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे वन विभागाचे मोठे कार्यालय आहे. त्याठिकाणी असलेल्या वन विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी आग लागल्याने अनेक प्रजातींची वृक्ष जळून खाक झाली आहेत. वन विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही त्याची दखल घेतली नाही. या सर्व प्रकरणांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी जत शहरातील अनेक वण्यप्रेमी व संघटनांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी या मागणीसाठी जत तालुक्यातील विविध संघटना व सामाजिक कार्यकर्ते वण्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहेत.

*दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी:

तालुक्यातील व्हसपेट, सोर्डी, जत उमराणी रस्त्या लागत असलेले वनक्षेत्र तसेच अंबाबाई मंदिर परिसर येथील वृक्ष आगीने भस्मसात झाले असून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हा वनअधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असूनही वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत आहेत. याची जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. 

*जळीत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न:

जळीत वृक्षां बाबत अनेक वृत्तपत्रातून आवाज उठविल्यानंतर खळबळ उडाली होती. जत येथील अधिकाऱ्यांनी चौकशीचे नाटक करून वनविभागाचे वृक्ष जळीत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत वन विभागामध्ये चौकशी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना वन अधिकारी हे सतत बाहेर गेले असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते.

Post a Comment

0 Comments