कोविड-19 मागदर्शक सुचनांच्या पालनाबाबत शासकीय यंत्रणांना । स्वतंत्र पथकाव्दारे तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


सांगली: राज्य शासनाकडील निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 29 जानेवारी च्या आदेशान्वये सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. सद्यस्थितीत कोविड-19 च्या रूग्ण संख्येत वाढ होत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये मंगल कार्यालयामध्ये तसेच इतर ठिकाणी कार्यक्रम सुरू असून मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी केली जात आहे. त्या अनुषंगाने कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या मागदर्शक सुचनांचे पालन होत असल्याबाबतची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली, पोलीस अधीक्षक सांगली, आयुक्त, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार या यंत्रणांना आदेश दिले आहेत.

या शासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर पथके तयार करून आपल्या कार्यक्षेत्रातील मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस, बाजार, मंडई, रेस्टॉरंट तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणी मर्यादित लोकांची उपस्थिती, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर, योग्य सामाजिक अंतर तसेच शासनाने वेळोवेळी संबंधित आस्थापनाबाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे सूचनांचे पालन होत असल्याबाबतची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

शासन निर्देशांचे तसेच मानक कार्यप्रणालीचे पालन न करणाऱ्या आस्थापना मालक, यजमान व्यक्ती व ग्राहक यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात यावी. तसेच याकरिता वेळोवेळी पारित करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Post a Comment

0 Comments