जत येथील श्री यल्लम्मा देवी परिसरात ७ दिबस जमावबंदी


जत/प्रतिनिधी: जत येथील श्री यल्लम्मा देवी परिसरात ७ दिबस जमावबंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली. तसेच कलम १४४ ही लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा ८ ते १३ जानेवारी दरम्यान भरणार होती. ८ जानेवारी रोजी गंधोटी, ९ जानेवारी रोजी नैवेद्द व १० जानेवारी रोजी कीच असे धार्मिक कार्यक्रम होणार होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आल्याने यात्रा काळात भाविकांना दर्शनासाठी बंदी राहणार आहे. ट्रस्ट व मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

        जत तहसील कार्यालयात आ. विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजनाबाबत बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आल्याचे ट्रस्टने सांगितले. ट्रस्टने यात्रा रद्द केल्यामुळे श्री यल्लम्मा देवी परिसरात ८ ते १३ जानेवारी दरम्यान जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मंदिरापासून दोन किलोमीटर परिसर सील करण्यात येणार असून भाविकांना यात्रा काळात दर्शन घेता येणार नाही. देवीचा धार्मिक विधी परंपरेनुसार मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तेव्हा भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विक्रमसिंह सावंत यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, यल्लम्मा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments