साळमळगेवाडी येथील २१ वर्षीय तरुणाचा निघ्रुण खून । मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न । आर्थिक देवाण-घेवाण किंवा अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याचा संशय


जत/प्रतिनिधी: साळमळगेवाडी ता. जत येथील दूध व्यवसायिक अजित बाबासाहेब खांडेकर (वय २१) याचा धारदार हत्याराने गळा चिरून व पोटात भोसकून निघ्रुणपणे खून करण्यात आला आहे. खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान साळमळगेवाडी ते खिलारवाडी दरम्यानच्या रस्त्यावर साळमळगेवाडी पासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा राजू बाबासाहेब खांडेकर यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

         व्यक्तीगत दोष, दूध व्यवसायातील स्पर्धा, आर्थिक देवाण-घेवाण किंवा अनैतिक संबंधातून सदरची घटना घडली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. 

         याबाबत अधिक माहिती अशी की, अजित खांडेकर हा सांळमळगेवाडी ,खिलारवाडी व बिळूर परिसरातील दुचाकी मोटरसायकलवर दूध संकलन करून जिरग्याळ ता. जत येथील दूध डेअरीत घालण्याचा व्यवसाय मागील चार पाच वर्षापासून करत होता. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे दुचाकी मोटरसायकलला घागरी बांधून व त्यांच्या पाठीमागे सिटवर कँन ठेवून सात वाजण्याच्या दरम्यान घरातून तो गेला होता. सदाशिव चमकेरी रा. बिळूर ता. जत यांच्या घरातून दूध संकलन करून सुमारे एक हजार फूट लांब अंतरावर आल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी अजित खांडेकर यास दुचाकी मोटरसायकल  साळमळगेवाडी ते खिलारवाडी दरम्यानच्या रस्त्यावर साळमळगेवाडी पासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी त्याला रस्त्यावर आडवून मुख्य रस्त्यापासून सुमारे १०० ते १२५ फुट मोकळ्या जागेत दुचाकी मोटारसायकलसह नेवून त्याच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून गळा तोडून व डावा हात तोडून आणि पोटात भोसकून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.    

          शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान दादासाहेब जाधव शेतजमिनीकडे जात असताना त्यांना अजित खांडेकर याची दुचाकी मोटरसायकल व तो मृतावस्थेत पडलेला आढळून आला त्याने याची माहिती माजी सरपंच आणू खांडेकर व गावकामगार पोलीस पाटील संभाजी ज्ञानू माने यांना दिली. त्यानंतर जत पोलिसांना कळविण्यात आले आहे.      

         अजित खांडेकर हा साळमळगेवाडी पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कित्तुरे मळा येथील शेत जमिनीतील घरात राहात होता तो अविवाहित होता. त्याच्यासमवेत आई, वडील, भाऊ , वहिनी असे एकत्रित राहत होते. सायंकाळी उशिरा अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले, जत विभाग पोलिस उप अधीक्षक रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक उत्तम जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.    

         खांडेकर याचा खून केल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु संपूर्ण मृतदेह जळालेला नाही. सदरचे कृत्य एकाच हल्ले खोराचे नसून दोन तीन हल्लेखोर असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Post a Comment

0 Comments