उटगी येथे राहत्या घरास आग; मानव मित्र संघटनेकडून मदतीचा हात । तुकाराम बाबा यांच्या हस्ते रोख रक्कम व भांडी देण्यात आली

जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील उटगी येथील कळळी वस्तीवर राहणाऱ्या रेवप्पा रायप्पा मेटगार यांच्या राहत्या पत्रा वजा घराला बुधवारी आग लागली व अख्खे कुटूंब रस्त्यावर आले. या घटनेची माहिती मिळताच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेची टीम तात्काळ घटनास्थळी पोहचली व त्यांना धीर दिला. गुरुवारी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थीतीत मेटगार कुटूंबियांना रोख पाच हजार रुपये, भांडी आदी साहित्य देण्यात आले. अडचणीच्या व संकटाच्या काळात मानव मित्र संघटना मदतीला धावून आल्याने मेटगार कुटूंबियांना अश्रू अनावर झाले होते.
        जत तालुक्यातील उटगी येथील रेवप्पा रायप्पा मेटगार यांच्या मालकीच्या घरास बुधवारी दुपारी तीन वाजता आग लागली. रेवप्पा यांची नात चुलीवर स्वयंपाक करत असताना चुलीतील निखाऱ्याने पेट घेऊन गवती छप्पर असलेल्या घराने पेट घेतला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही शेजारच्या नागरिकांनी आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण यश आले नाही. आगीमुळे घरातील संसारोपयोगी साहित्य, अन्यधान्य, एक तोळा सोने, रोख रक्कम असे दीड लाखाचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच गावकाम तलाठी कार्यालयाकडून पंचनामा करण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी टी. एस. तळपे, तलाठी नितीन कुंभार, धानाप्पा कोळी, अल्लाबक्ष मुल्ला उपस्थित होते. मजुरीचे काम करून पोट भरून घेणाऱ्या मेटगार कुटुंबियांचे राहत्या घराला आगीने गिळंकृत केल्याने कुटुंबीय रस्त्यावर आले आहे. मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या रेवप्पा मेटगार यांना माजी उपसरपंच चंद्रकांत डोळळी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आर्थिक मदत दिली आहे.


मानव मित्र आहे मदतीला:
जत तालुक्यात घर जळाले व अन्य काही घटना घडल्या की श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने तात्काळ मदत देण्यात येते. एखाद्याचे घर जळाले तर त्याला तात्काळ पाच हजार रुपये मदत दिली जाते. या महिन्यापासून मानव मित्र संघटनेकडून पाच हजार रुपये मदत तर केलीच त्याचबरोबर संघटनेचे सदस्य सिद्राय्या मोरे, बिराप्पा मोरे यांनी घर जळालेल्या कुटूंबियास भांडे द्यावेत अशी संकल्पना मांडली व त्यांच्या वतीने भांडेही दिले. उटगी येथील घटना कळताच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सदस्य घटनास्थळी पोहचले व त्यांनी कुटूंबियांना धीर देत या घटनेची माहिती तुकाराम बाबा यांना सांगितली. गुरुवारी तुकाराम बाबा हे स्वतः उटगी येथे आले व त्यांनी मेटगार कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने रोख रक्कम व भांडे कुटूंबियांना देण्यात आले. यावेळी माजी मुख्याध्यापक एम. एस. पाटील, माजी उपसरपंच चंद्रकांत डोळळी, महांतेश पाटील, ग्रामसेवक वाय डी चिगदुळे, सिद्राय्या मोरे, बिराप्पा मोरे उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments