जत तालुक्यात दादागिरी व अवैद्य धंद्यांना ऊत । शहरातील गाव गुंडांना पोलिसांचे अभय


जत/प्रतिनिधी: जत शहरासह तालुक्यात मटका, जुगार व अवैद्य धंदे वाढले असून पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी या सर्व प्रकाराकडे जातीने लक्ष घालून अवैद्य धंदे बंद करावेत, अशी मागणी सुज्ञ नागरिकातून होत आहे. जत तालुक्यासह परिसरात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. या अवैध धंद्यांना राजकीय व पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा होत आहे. पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने पोलिस निरीक्षक यांची बदली करण्याची मागणी जोर धरत आहे. जत पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ५५ ते ६० गावे येतात.

तालुक्यातील पूर्व व दक्षिण भागातील अनेक गावात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. मात्र पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने या परिसरात खुलेआम अवैध धंदे केले जात आहेत. दारू, गांजा, मटका, जुगार असे अनेक अवैध धंदे बिट अंमलदारांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस बिट अंमलदारांकडून तक्रारदारांनाच धमकावले जाते. जत शहरात तर जवळपास वीस ते पंचवीस मटका बुकीचालक आहेत. त्यांच्यात तीव्र स्पर्धा सुरू आहे. दोन-तीन वर्षापूर्वी मटका व्यवसाय काहीसा कमी झाला होता. मात्र तो पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. गल्लीबोळात सुरू असलेले जुगाराचे अड्डे तसेच हॉटेल व ढाब्यावर मिळणारी दारू यामुळे तरुणपिढी व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यांच्या पैशातूनच शहरात हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकारांकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आहे. 

तसेच शहरात भुरट्या गाव गुंडानकडून गुन्हेगारीच्या घटना नित्याने घडत आहेत. शहरातील गाव गुंडानकडून लहान तसेच मोठ्या-थोरांचा विचार न करता अरेरावी करणे, धमकावणे तसेच अंगावर धावून जाणे आसले प्रकार रोज पाहवयास मिळत आहेत. मात्र आशा तक्रारी तक्रारदार पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी गेले असता, गुन्हा दाखल करून घेण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे कागदावर गुन्हे कमी दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात अशा घटनांना शहरात ऊत आला आहे. या सर्व प्रकाराला आळा बसणे गरजेचे असल्याने जत परिसरातील नागरिक पोलिस अधीक्षकांना भेटणार असल्याचे समजते आहे.

तत्कालीन पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या कार्यकाळात त्यांनी अवैध धंदे व गावगुंडांना चाप बसवला होता. परंतु यांची बदली होताच पुन्हा अवैध धंदे व गावगुंडांनकडून दादागिरीच्या घटना वाढत असल्याचे शहरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments