शेतळ्यांच्या अनुदानअभावी मागासवर्गीय शेतकऱ्यांची परवड!

अकरा महिन्यांपासून अनुदान मिळेना; मागासवर्गीयांवर अन्याय झाल्याची भावना तीव्र; लाभार्थी आर्थिक संकटात


जत/प्रतिनिधी: राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने  मागासवर्गीय शेतकऱ्यासाठी लागू असलेल्या सामूहिक शेततलाव योजनेतुन लाभ घेतलेल्या व शासनाच्या आराखड्यानुसार काम पूर्ण केलेल्या सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरयांचे अनुदान दहा महिन्याच्या प्रतिक्षेनंतरही  देण्यात आले नाही. कृषी खात्याकडून शेतकऱयांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यास विलंब व टाळाटाळ केली जात आहे. अनुदान अभावी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाकडून देय अनुदान गेल्या दहा महिन्यापासून प्रलंबीत ठेवल्याने कृषी खात्याच्या या धोरणाबद्दल मागासवर्गीय शेतकऱ्यावर अन्याय झाल्याची भावना असून याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.                   

             सांगली जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कर्ज काढून व काहींनी हातउसने काढून लाखो रुपये खर्च करून शासनाच्या भरवशावर प्लास्टिक कागदासह सामूहिक शेततलावाचे काम पूर्ण केले आहे. पूर्वसंमत्ती घेऊन जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात सर्व शेतकऱ्यांनी काम पूर्ण केले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अधिकारी येऊन पूर्ण झालेल्या कामाचे जिओ टॅगिंग व मूल्यांकन केले आहे. संबधीत अधिकाऱयांनी मूल्यांकन करून दहा महिने उलटले तरी कृषी खात्याकडून अनुदान न मिळाल्याने शेतकरी

आर्थिक अडचणीत आला आहे. संबंधित लाभार्थ्यांनी वारंवार जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अनुदानासंदर्भात मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने कृषी खात्याबद्दल शेतकरयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. 

              याबाबत जत व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता. आमच्याकडून शेततलाव संबंधित मूल्यांकन पूर्ण करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले आहे. आमचे काम आम्ही केले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून बिले प्रलंबित आहेत. काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल. असे गेल्या दहा महिन्यापासून येथील स्थानिक अधिकारी सांगत आहेत. असे पुन्हा पुन्हा सांगून शेतकऱ्यांची बोळवण करीत आहेत.परंतु प्रत्यक्षात दहा महिने उलटले तरी अनुदान काही देण्यात आले नाही. त्यामुळे अनुदान अभावी शेतकऱयांची परवड सुरू असून याचे काहीच सोयरसुतक तालुका आणि जिल्हा कृषी ऑफिसला नाही. केवळ अनुदान येणार येणार म्हणून वेळ घालण्या पलीकडे या अधिकाऱ्यांनी ठोस असे काही केले नसल्याचा आरोप अन्यायग्रस्त मागासवर्गीय शेतकऱ्याकडून केला जात आहे. यापूर्वी कृषि विभागाने चुकीच्या पध्दतीने उपलब्ध निधीचे वाटप केल्याने या शेतकऱ्यांना कवडीही मिळाली नाही. अनुदानासाठी शासनाचा उंबरठा झिजविण्याची मागासवर्गीय शेतकरयांवर वेळ आली असून त्यांना लाखो रुपयांचा अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. दहा महिने अनुदान प्रलंबित किंवा रखडत ठेऊन आमच्यावर शासनाकडून अन्याय झाल्याची भावना लाभार्थी शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे. तातडीने अशा वंचीत शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी असून तात्काळ अनुदान नाही दिल्यास कृषि विभागाच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जत तालुक्यातील शेतकऱयांनी दिला आहे.

शासनाने व्याजासह मागासवर्गीय शेतकऱ्यांचे अनुदान चुकते करावे... 

अतिवृष्टीमुळे शेतकरी सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील सामूहिक शेततळ्याचे शेतकऱ्यांना सरकारने त्वरीत अनुदान द्यावे यासाठी कृषी खात्याकडे मी गेल्या दहा महिन्यापासून पाठपुरावा सुरू केला आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाची लवकर मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तसे काही झाले नाही. अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे योजनेतून शेततळे मिळाले परंतु शेततळ्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान दहा महिन्यापासून वर्ग न झाल्याने, मागासवर्गीय लाभार्थी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारकडे वारंवार मागणी करूनही अनुदान मिळत नसल्याने कृषी खात्याविरुद्ध तीव्र नाराजी आहे. एकट्या जत तालुक्यातील शेततळ्यांचे 51 कोटीहुन अधिक रुपयांचे अनुदान शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

           पूर्वीच्या शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही आणि आता नवीन शेतकऱ्यांना शेततळे मिळत नाही अशा दुहेरी संकटात जत तालुक्यातील मागासवर्गीय शेतकरी सापडला आहे. शेततळ्याचे अनुदानासाठी  आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे  मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शासनाने व्याजासह मागासवर्गीय शेतकऱ्यांचे अनुदान खात्यावर वर्ग करावे अशी तमाम शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी आहे. शासनाने सहानभूतीपूर्वक विचार करावे अशी मागणी बोर्गी ता.जत येथील सौ जयश्री व्हनखंडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments