वाढदिवसानिमित्त विनापरवाना मोटारसायकल रॅली काढणे पडले महागात । मोटारसायकलवरून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना जत पोलिसांनी दिला चोप । पंधरा ते वीस तरुणांच्या विरोधात जत पोलिसात गुन्हे दाखल


जत/प्रतिनिधी: जत शहरातील संभाजी चौक ते जय हिंद चौक दरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग करून वाढदिवसा निमित्त बेकायदेशीरपणे कोणतीही परवानगी काढली नसताना मोटरसायकल रॅली काढून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्याच्या आरोपावरून बंडू वाघमारे व इतर अनोळखी पंधरा ते वीस तरुणाच्या विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा वाघमारे याचेसह पंधरा ते वीस जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. 

          याबाबत अधिक माहिती अशी की, बंडू वाघमारे याने वाढदिवसानिमित्त संभाजी चौक ते जयहिंद चौक दरम्यान दुचाकी व चारचाकी वाहनांसह पन्नास ते साठ दुचाकी मोटर सायकल समवेत जत शहरातील संभाजी चौक, वाचनालय चौक, गांधी चौक, बनाळी चौक, मटण मार्केट मार्गे मोटरसायकल रॅली काढली होती. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व पुंगळी काढलेल्या मोटरसायकलचे हॉर्न वाजवून आरडाओरडा करत दुचाकी मोटरसायकल रॅली काढण्यात येत होती. या रॅलीची पोलिसांकडून रीतसर परवानगी घेण्यात आली नव्हती. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनि तात्काळ घटना स्थळावर जाऊन रॅलीत सहभागी झालेल्या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु बंडू वाघमारे वगळता इतर सर्व तरूण दुचाकी मोटरसायकल जागेवर सोडून त्यांनी पलायन केले. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या काही तरुणांना पोलिसांनी चोप दिला आहे. रात्री उशिरा या संदर्भात रामेश्वर पाटील यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. मोटर सायकल रॅली काढण्यापूर्वी पोलिसांनी या तरुणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी पोलिसांचे काहीच ऐकून न घेता मोटर सायकल रॅली काढली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कणसे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments