गिरगाव येथे वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्याने युवकाची आत्महत्या


जत/प्रतिनिधी: वडिलांनी नवीन मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने शंकर निंगप्पा मांग (वय २२ रा. गिरगाव ता. जत) येथील तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

शंकर मांग हा गिरगाव येथे आपल्या आई-वडिलांना शेतीकामात मदत करत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो वडिलांकडे नवीन मोबाईल घेऊन देण्याची मागणी करत होता. गुरुवारी सकाळी पुन्हा वडिलांना त्याने मोबाईल घेऊन देण्यास सांगितले. मात्र वडिलांनी नकार दिला व ते कामानिमित्त घरातून बाहेर पडले. त्यानंतर सकाळी ९ च्या दरम्यान शंकरने घरात कोणी नसताना, गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. मृताचे वडील निंगप्पा लकाप्पा मांग यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments