जतमध्ये १ लाख ८० हजारांचा दारू साठा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील आंसगीतुर्क येथे बेकायदा दारू अड्ड्यावर छापा टाकत सुमारे 1 लाख 80 हजार रूपयाचा दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी मिरासाहेब मोदिन मुजावर (वय 28,रा.आसंगी तुर्क) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने उमदी पोलीस ठाणे हद्दीत केली आहे.

          पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे याची माहिती काढुन त्याचेवर कारवाई करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे दिनांक 26 डिसेंबरला जत तालुक्यातील आंसगीतुर्क येथील बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्याआधारे मिरासाब मुजावर यांच्या घराशेजारी छापा टाकला असता, त्यांच्या ताब्यात नॉकआउट पंच कंपनीच्या 650 मिलीच्या बिअरचे 63 बॉक्स किंमत 1 लाख 51 हजार 200 रूपये व नॉकआउट पंच कंपनीच्या 330 मिली बिअरचे 12 बॉक्स किंमत 28 हजार 800 रूपये असा एकूण 1 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित मिरासाहेब मुजावर यांच्यावर दारू बंदी अधिनियम कलम 65 ड प्रमाणे उमदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी उमदी पोलीस ठाणे येथे रिपोर्टने जमा करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, जितेन्द्र जाधव, आमसिध्दा खोत, मच्छिंद्र बर्डे, सतिश अलदर, राहुल जाधव, गुदतसर पाथरवट, राजु शिरोळकर, बजरंग शिरतोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू विकली जात आहे. बेकायदा दारू विक्रेत्याकडे तब्बल दोनदोन लाखाची दारू येते कोठून. त्याचा पुरवठादार कोन, याची तपासणी करण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची असतानाही त्याचे अधिकारी उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार करत असून, जतचे कार्यालय कुलूपबंद ठेवून सध्या मिरज येथून एवढ्या मोठ्या तालुक्याचा कारभार हाकला जात आहे. या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या वर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments