बेवनूर येथील बिल्डकॉन कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध संभाजी ब्रिगेडकडून िल्हाधिकार्‍यांना निवेदन; न्याय न मिळालेस प्रजासत्ताक दिनादिवशी दिला आंदोलनाचा इशारा


जत/प्रतिनिधी: बेवनूर ता. जत येथे दिलीप बिल्डकॉन कंपनीचे अवैध्यरित्या शेतक-यांच्या जमीनीवर अतिक्रमण करुन केलेल्या उत्खननामुळे व मोठया प्रमाणात अमोनिया वापरुन बोअर ब्लास्ट केल्यामुळे. परिसरातील लोकवस्तीमधील घरांना पडलेल्या भेगांची व शेतक-यांचे झालेले नुकसान भरपाई मिळेपर्यंत उत्खनन बंद ठेवणेत यावे, या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडकडून मा. जिल्हाधीकारीसो याना देणेत आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक, मोहन पाटील, संदीप नाईक, बापूसो शिंदे उपस्थित होते.
            निवेदनात म्हटले आहे की, बेवनूर ता. जत येथील गट नं. २४९ मध्ये दिलीप बिल्डकॉन कंपनीचे अवैध्यरित्या उत्खनन चालु असुन त्यांनी पूर्वेस गट नं. २५१ मच्छिंद्र तुळशीराम शिंदे व पश्चिमेस गट नं. २४९ मध्येच शिवाजी रामचंद्र शिंदे यांचे जमिनीमध्ये डि.बी.एल. चे परिक्षेत्र सोडन सेफ झोन न सोडता अतिक्रमण केले आहे. तरी त्या संदर्भात मच्छिंद्र तुळशीराम शिंदे गट नं. २५१ यानी दि. १६/१०/२०२० रोजी मा. उपविभागीय अधिकारी, मा. तहसिलदार, मा. पोलीस निरीक्षक यांना अर्ज केले होते. तसेच शिवाजी रामचंद्र शिंदे दि. ०५/१०/२०२० रोजी मा. उपविभागीय अधिकारी, मा. तहसिलदार, मा. पोलीस निरीक्षक यांना अर्ज केले होते. नंतर आम्ही वस्तीवरील सर्व लोकांनी मिळून कंपनीस अतिक्रमण करु नये म्हणून व अमोनियाचा मोठया प्रमाणात वापर करुन २० फुटापेक्षा जास्त खोलीच्या बोअर ब्लास्टमुळे लोकवस्तीमधील घरांना भेगा पडून घरांची दुर्लभ अवस्था निर्माण झाली आहे. व संरक्षीत कंपाऊंड नसल्यामुळे व बोअर ब्लास्टमुळे लोकवस्तीमध्ये दगड पडतात. त्यामुळे चरणारी जनावरे, लहान मुले, वृध्द व्यक्ती व वस्तीमधील सर्व लोकांचे जिवनास धोका निर्माण झालेला आहे. तेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु ते धमकावण्याची भाषा करतात. त्यांचे लायझनिंग मॅनेजर रोहीत त्रिपाठी हे "तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही बघून घेवू" अशी भाषा वापरतात. म्हणून सर्व लोकांनी व संभाजी ब्रिगेड यांनी दि. २६/१०/२०२o रोजी प्रांत ऑफिस, तहसिल ऑफीस, पोलीस निरीक्षक यांना डि.बी.एल कंपनीवरती कारवाई करणेबाबत अर्ज केला होता.
            तसेच ग्रामपंचायत बेवनूर यांना देखील दि. २९/१०/२०२० रोजी डि.बी.एल कंपनीची एन.ओ.सी. रद्द करणेबाबत व प्रत्यक्ष पंचनामा करणेबाबत अर्ज केला होता. त्याप्रमाणे त्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहता दि. ०७/११/२०२० रोजी पंचनामा करुन दि. ०९/११/२०२० रोजी डि.बी.एल कंपनीचे एन.ओ. सी. रद्द केले आहे. व तसा अहवाल तहसिल ऑफीसला कळविलेला आहे. डि.बी.एल कंपनीस नोटीस काढून एन.ओ.सी. रद्द केलेचे कळविले आहे. परंत अद्याप काम बंद केलेले नाही. तसेच कंपनीकडून अवैध्य वाहतूक केली जाते. त्यांच्या वाहनामध्ये दगड वाहतूक करत असताना फाळके लावले जात नाही. धूळ मोठया प्रमाणात उडते. दगड वाहतूक करणा-या वाहनांवरती ताडपत्री झाकली जात नाही. त्यामुळे रस्त्यावरती दगड पडतात. धुळीमुळे जुनोनी ते बेवनूर रस्त्यावरती अपघाताचे प्रमाणे वाढले आहे. दि. २४/०९/२०२० रोजी मौजे बेवनूर येथे दादासो शंकर सरगर व दि. ३०/०९/२०२० रोजी वसंत धोंडीराम माने यांचा अपघात झाला आहे. त्या सदंर्भात सांगोला पी.डब्ल्यू.डी. व जत पंचायत समिती यांनी रस्ता खराब झालेबद्दल व नुकसान भरपाई मिळणेबाबत डि.बी.एल कंपनीस नोटीस देखील काढलेली आहे. तसेच उत्खनन चालू असलेल्या परिसराच्या पश्चिम बाजूस जुनोनी हद्द असून जवळच फॉरेस्ट आहे. त्यांचाही बफर झोन सोडला नाही व जुनोनी ता. सांगोला जि. सोलापूर हद्दीमध्ये फॉरेस्टच्या पश्चिमेस सिमेलगत खडी क्रशर व कॅम्प आहे. त्यामुळे तेथील पशु-पक्षी व वनांचा पूर्ण -हास होवून ध्वनीप्रदूषण व धुळीमुळे हवा प्रदूषण होत आहे. जत तहसिलकडून दि. ०६/११/२०२० रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा झाला आहे. परंतु अद्याप कंपनीवरती कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही व आम्हास नुकसान भरपाई मिळालेली नाही. बोअर ब्लास्ट बंद नाहीत, सायरन नाहीत, संरक्षीत कंपाऊंड, बारबेट वायर नाही व उत्खननही बंद नाही.
            तसेच डि.बी.एल. कंपनीने उत्खनन चालू करताना शेजारील शेतक-यांचे (जमिन धारकांचे) व लोकवस्तीमधील लोकांचे नाहरकत देखील घेतली नाही. पोलीस ठाणे जत यांनीदेखील वारंवार अर्ज करुन त्यांचे अधिकारी त्रिपाठी धमकावतात व पोलीसांकडून तुम्हाला उचलून जेलमध्ये टाकतो अशी धमकी देतात व लोकवस्तीमध्ये दगड पडतात तेथील जनजिवनास धोका आहे. असे लिखीत स्वरुपात कळवून देखील त्यांचेकडून कोणतीही कारवाई कंपनीवर अथवा त्यांचे अधिका-यांवर झाली नाही व विनंती करुन देखील पोलीस ठाणे जत यांचेकडून प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा देखील केला गेला नाही.
            लवकरात लवकर सदर कंपनीवर कारवाई करणेत यावी तसेच जोपर्यंत अतिक्रमण केलेल्या जमिनीचे नुकसान भरपाई मिळत नाही व लोकवस्तीमधील घरांची नुकसान भरपाई मिळत नाही तसेच उत्खनन परिसरात संरक्षीत कंपाऊंड घातले जात नाही व वाहतूकीच्या नियमांचे पालन होत नाही. तोपर्यंत डि.बी.एल. कंपनीचे पूर्ण काम बंद ठेवणेत यावे तसेच दि. २५/०१/२०२१ रोजी पर्यंत न्याय न मिळालेस आम्ही दि. २६/०१/२०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेड व पिडीत शेतकरी यांचेवतीने देणेत आला आहे.

Post a Comment

0 Comments