जत एसटी आगाराचा भोंगळ कारभार तातडीने सुधारावा; जत पॅंथर सेनेचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन


जत/प्रतिनिधी : जत एसटी आगाराच्या अनेक तक्रारी प्रवाश्यानी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भुपेंद्र कांबळे यांच्याकडे केल्या होत्या. त्याअनुषंगाने जत एसटी आगाराचा भोंगळ कारभार तातडीने सुधारावा व जत ग्रामीण भागातील सर्व फेऱ्या सुरू करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांना देण्यात आले.

           निवेदनात म्हटले आहे की, कोरोनानंतर जत आगाराचा भोंगळ कारभार सातत्याने समोर येत आहे. जत ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या बंद आहेत. गेल्या महिन्यापासून आगाराचा दूरध्वनी बंद आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. कोणत्याही गाडया वेळेवर सोडल्या जात नाहीत. गाड्यांची स्वच्छता व सॅनिटाइझर केले जात नाही. ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यास अडचणीचे ठरत आहे. सांगली मधून जतकडे येणारी शेवटची गाडी बंद आहे. आगाराच्या परिसरात अस्वच्छता दिसून येत आहेत. प्रवाश्याना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. उपहारगृहातील पाणी पिण्यासाठी घ्यावे लागत आहे. या सर्व बाबींची आगार प्रमुखांनी येत्या दहा दिवसात सुधारणा करावी अन्यथा तीव्र आंदोलन व रास्ता रोको करू असा इशारा निवेदनात दिला आहे. हे निवेदन दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष भूपेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल सनमडीकर, दिपक कांबळे, रोहन साळे, विक्रांत कांबळे आदींनी हे निवेदन दिले आहे.

Post a Comment

0 Comments