७३व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची यशस्वीरित्या सांगता । जीवन सहज, सुंदर आणि स्थिर बनविण्यासाठी परमात्म्याशी नाते जोडा- निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज


८ डिसेंबर, २०२०: ‘‘जीवन सहज, सुंदर आणि स्थिर बनविण्यासाठी दिव्य गुणांचा स्रोत असलेल्या परमात्म्याशी नाते जोडा.’’ असे विचार सद्गरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी मानवतेला प्रेरित करताना तीन दिवसीय ७३व्या व्हर्च्युअल वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन दिवशी ७ डिसेंबर, २०२० रोजी आपल्या प्रवचनातून व्यक्त केले. या संत समागमाचा संत निरंकारी मिशनची वेबसाईट व संस्कार टी.व्ही.चॅनलच्या माध्यमातून जगभर पसरलेल्या लाखो भाविक भक्तगणांनी आनंद घेतला.

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी व्हर्च्युअल रुपात आयोजित केलेल्या ७३व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सांगता समारोहामध्ये काल ७ डिसेंबर, २०२० रोजी मानवमात्राला आवाहन करताना उपरोक्त उद्गार काढले. संत निरंकारी मिशनची वेबसाईट आणि संस्कार टी.व्ही.चॅनलवर मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देश आणि जगभरातील लाखो भाविक भक्तगणांनी आणि जनसामान्यांनी या संत समागमाचा आनंद प्राप्त केला.  

सद्गुरु माता सुदीक्षाजी म्हणाल्या, की जीवनातील प्रत्येक पैलुमध्ये स्थिरतेची गरज आहे. परमात्मा स्थिर आहे, शाश्वत आहे आणि एकरस आहे. जेव्हा आपण आपले नाते याच्याशी जोडून ठेवता तेव्हा मनामध्येही स्थैर्य येते आणि आपली विवेकपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यायोगे जीवनातील चढ-उतारांचा सामना आपण सहजपणे करु शकतो. 

ही बाब अधिक स्पष्ट करताना सद्गुरु माताजींनी झाडाचे उदाहरण देऊन सांगितले, की ऋतुमानानुसार झाडाला फळ येण्यापूर्वी फूल लागते. नंतर फळे लागून परिपक्व झाल्यानंतर ती काढण्याचीही वेळ येते. त्यानंतर मोसम बदलतो आणि पानगळ सुरु होते. पाने गळून पडल्याने हिरवेगार असलेले ते झाड आणि त्याच्या फांद्या सुकलेल्या लाकडासारख्या दिसू लागतात. ऋतु बदलल्यामुळे झाडाच्या बाबतीत ही अस्थिरतेची स्थिती आली; परंतु तरीही ते झाड आपल्या जागी घट्ट उभे असते. कारण ते आपल्या मूळांशी भक्कमपणे जोडलेले असते.  अशाच प्रकारे आमची मुळे, आमचा आधार, आमचा पाया परमात्म्याशी जोडलेला असेल, त्याच्याशी एकरुप झालेला असेल तर परिस्थितीच्या प्रभावामुळे मनात येणारे विचार आम्हाला विचलीत करु शकत नाहीत.  

या अगोदर समागमाच्या पहिल्या दिवशी, ५ डिसेंबर रोजी सद्गुरु माताजींनी ‘मानवतेच्या नावे संदेश’ प्रेषित करुन समागमाचे विधिवत उद्घाटन केले ज्यामध्ये भौतिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले गेले. 

पहिल्या दिवसाच्या मुख्य प्रवचनामध्ये सद्गुरु माताजींनी सांगितले, की सृष्टीमध्ये कोणतीही वस्तू स्थिर नाही. प्रत्येक वस्तुमध्ये परिवर्तन घडून येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव करुन दिली, की कोणतीही वस्तू कधीही नष्ट होऊ शकते. अशा नश्वर आणि अस्थिर वस्तूंच्या आसक्तीमुळेच आपले मन विचलीत होते आणि त्याचा प्रभाव भावनिक, मानसिक आणि शारीरिक रुपात आमच्या जीवनावर पडत असतो.  अशा अवस्थेमध्ये आमच्या मनाला आधार देऊ शकते ती केवळ ‘स्थिरता’. आपण जेव्हा ‘स्थिरता’ धारण करतो तेव्हा शाश्वत आनंदाबरोबरच सदृढपणे मानवीयतेच्या दिशेने अग्रेसर होऊ शकतो. 

स्थिरतेचा भावार्थ समजावताना सद्गुरु माताजींनी सांगितले, की जगतामध्ये उलथापालथ होतच राहणार आहे. परिस्थिती कधी आम्हाला अनुकूल असेल तर कधी प्रतिकूल. कित्येकदा आपले स्वत:चे विचार आम्हाला कधी एका दिशेला घेऊन जातात तर कधी दुसऱ्या दिशेला. परिणामी आपण कधी फार आनंदित होतो तर कधी इतके निराश होऊन जातो की डिप्रेशनची स्थिती उद्भवते. मात्र जीवनातीच चढ-उतारामध्ये समतोल ठेवून चालल्याने आम्हाला स्थिरता प्राप्त होते.  

सेवादल रैली

समागमाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ एका रोमहर्षक सेवादल रॅलीने झाला ज्यामध्ये देश-विदेशातील सेवादल बंधु-भगिनींनी सेवादल प्रार्थना, कवायत, खेळ तसेच विविध भाषांमध्ये लघुनाटिकांच्या माध्यमातून मिशनचा संदेश प्रस्तुत केला.  

सेवादल रॅलीला आपले आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगितले, की कोरोनामुळे जीवनात कितीतरी त्रास आणि समस्या आल्या तरी ज्यांचे मन स्थिर होते आणि ज्यांनी आपले मन सेवाभावनेशी जोडून ठेवले त्यांच्या जीवनात सहजता आणि स्थिरता टिकून राहिली. यावर्षीच्या विपरीत परिस्थितीमध्ये कित्येकांची जीवनशैलीच बदलून गेली; परंतु सेवादार भक्तांनी या स्थितीमध्येही सेवेचा भाव कायम ठेवत आमच्याकडून सेवा घडावी अशीच कामना केली. 

सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की मिशनकडून सरकारी यंत्रणांशी समन्वय साधून मानवतेच्या सेवेमध्ये योगदान दिले गेले. जिथे जिथे गरज होती तिथे गाव, शहर, वस्त्यांमध्ये जाऊन राशन व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. मिशनची कित्येक सत्संग भवने कोरोना सेंटरसाठी उपलब्ध करुन देण्यात आली. काही काळानंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये थोडी शिथिलता आल्यानंतर कोरोनामुळे उद्भवलेल्या रक्त टंचाईवर मात करण्यासाठी मिशनकडून जागोजागी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले.  

सद्गुरु माताजींनी म्हटले, की जर आपल्याला सेवा करायची असेल तर ती केवळ आपल्या परिवारापर्यंत सीमित न ठेवता अवघ्या जगताची करायची आहे. कारण सेवादार ‘मानवता है धर्म हमारा, हम केवल इन्सान है’ असा भाव धारण करतो. सेवेला सौभाग्य समजून विनम्रभावाने करावी, त्यामध्ये उपकाराचा भाव नसावा.  

दुसऱ्या दिवसाच्या सत्संग समारोहाला संबोधित करताना सद्गुरु माताजींनी प्रतिपादन केले, की जेव्हा आपण परमात्म्याची ओळख करुन आपणही त्याचेच अंश आहोत हे जाणून घेतो तेव्हा जीवनामध्ये स्थिरता येते. जर आपण असा विचार करु, की बाहेरचे वातावरण माझ्या मनाप्रमाणे असेल तेव्हा माझ्या मनाला स्थिरता येईल, तर ते शक्य नाही. स्थिरता ही अंत:करणाच्या स्थितीवर अवलंबून आहे. अंत:करणाला परमात्म्याशी जोडून स्थिर करायचे आहे. जर आमची आंतरिक स्थिती भक्कम असेल तर मग कोणतीही गोष्ट आम्हाला कितीही विचलीत करण्याचा प्रयत्न करत असली तरी आम्ही विचलीत होणार नाही.

सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, विशाल सागरात खोलवर जाऊन पाहिले तर तो शांतच असतो, तिथे हालचाल जाणवत नाही. परंतु जेव्हा आपण त्याच्या किनाऱ्याकडे येतो तेव्हा त्याची खोली कमी झाल्याने त्याच्यामध्ये मोठमोठ्या लाटा उसळतात आणि त्यांचा आवाजही ऐकायला येतो.  अशाच प्रकारे जो मनुष्य सहनशील असतो त्याने कितीतरी गोष्टी स्वत:वर घेतल्या तरी ईश्वराशी जोडून राहिल्याने त्याच्या मनाची स्थिरता कायम राहते. याउलट जो मनुष्य लहान-सहान गोष्टींचा प्रभाव ग्रहण करतो त्याच्या वर्तनावरुनच समजते, की त्याची अवस्था स्थिर नाही.  

कवि दरबार

समागमाच्या समापन सत्रामध्ये ७ डिसेंबरच्या सायंकाळी एक बहुभाषी कवि संमेलन आयोजित करण्यात आले ज्यामध्ये देश-विदेशातील २१ कविंनी ‘स्थिर प्रभुशी मनाला जोडू या, जीवन आपुले सहज करू या’ या शीर्षकावर आधारित कविता हिंदी, पंजाबी, हरियाणवी, राजस्थानी आणि इंग्रजी भाषांतून आपापल्या सादर केल्या. या कवी सज्जनांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून मानवी जीवनात स्थिरतेचे महत्व समजावून स्थिरतेच्या प्रत्येक पैलुवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. 

समागमाच्या तिन्ही दिवशी भारतासह जगभरातील ब्रह्मज्ञानी संत वक्त्यांनी विविध भाषांच्या माध्यमातून समागमामध्ये आपले उद्बोधक विचार मांडले. तसेच संपूर्ण अवतार बाणी तथा संपूर्ण हरदेव बाणी या काव्यमय रचनांमधील पदांचे सुमधूर गायन, पुरातन संतांची भजने, अभंगवाणी आणि मिशनच्या गीतकारांच्या प्रेरणादायी रचनांचे गायन करुन समागमाचा आनंद घेणाऱ्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. 

आपापल्या घरांमध्ये बसूनच व्हर्च्युअल रुपात लक्षावधी भक्तगणांनी आणि जनसामान्यांनी या संत समागमाचा आनंद प्राप्त केला आणि पुढील समागम प्रत्यक्ष रुपात मैदानावर आयोजित व्हावा अशी मनोमन प्रार्थनाही केली.

Post a Comment

0 Comments