जत परिसरात वाघाचा वावर असल्याची अफवा 'तो' प्राणी तरस : वन विभागाची माहिती

 

जत/प्रतिनिधी: जत येथील अंबाबाई डोंगर परिसरातील वन विभागाच्या हद्दीमध्ये वाघ आल्याची अफवा सोसल मीडियावर पसरवली जात आहे. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. ज्या नागरिकांनी त्याला पाहिले आहे तो वाघ नसून तरस हा प्राणी आहे, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी एम.एच. मोहिते यांनी दिली.

ते म्हणाले, वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष अंबाबाई डोंगर परिसरात जाऊन पाहणी करून ठसे तपासले आहेत. या संपूर्ण परिसरात वाघाचे ठसे आढळून आले नाहीत. देवनाळ, मेंढेगिरी, जत, खलाटी, वाशान व प्रतापूर परिसरातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्यामुळे झाडांची दाटी वाढली आहे. त्यामुळे इतर जंगली प्राण्यांसोबत तरसांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांचे अधूनमधून नागरिकांना दर्शन होत आहे. नागरिकांनी भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. तरस हा प्राणी शक्यतो इतरावर हल्ला करत नाही, असा खुलासा वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एच. मोहिते यांनी केला आहे.

सोशल मीडियामधून चुकीचा फोटो प्रसिद्ध करून चर्चा सुरू आहे, ती चुकीची व अफवा पसरवणारी आहे. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments