जतमध्ये चंदन तस्करीवर छापा; सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त


जत/प्रतिनिधी: जत शहरातील सोलनकर चौक येथे चंदन तस्करी करणारे दोन इसम येणार असल्याची माहिती खबर्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने जत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार प्रवीण पाटील व केरबा चव्हाण यांनी सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपयांचे चंदन व 1 दुचाकी मोटरसायकल असा एकूण 1 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, जत शहरातील सोलनकर चौक येथे राजु चन्नाप्पा भोसले (वय १९, रा. पंढरपूर जि. सोलापूर सध्या रा. घेरडी ता. सांगोला) व सीताराम बळिराम चंदनवाले (वय १९ रा. रोपळे ता. पंढरपूर जि. सोलापूर. सध्या रा. घेरडी ता. सांगोला) यांना शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास मोटारसायकल (क्र. एम. एच. १३ बी.वाय. ७८०५) वरून जात असताना पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांची झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याजवळ विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असलेल्या प्लास्टिकच्या पांढऱ्या पोत्यात चंदनाचे तुकडे आढळून आले. व एक होंडा शाईन कंपनीची मोटार सायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. वरील दोन आरोपीच्या विरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवलदार प्रवीण पाटील करत आहेत.

Post a Comment

0 Comments