बिळूर येथे घरगुती कौटुंबिक व शेतजमीन वादातून जन्मदात्या पित्याची हत्या

जत/प्रतिनिधी: बिळूर ता.जत येथे घरगुती कौटुंबिक  व शेतजमीन वादातून भिमू सत्याप्पा जाबगोंड (वय ८३) याच्या डोक्यात दगड घालून व विळ्याने वार करून त्याचा मुलगा सदाशिव भिमू जाबगोंड (वय ३५) याने निर्घृण खून केला आहे. ही घटना सोमवार दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान रहात्या घरासमोरच घडली आहे. याप्रकरणी मृत भिमू यांची मुलगी महानंदा राजेंद्र कोरे (वय ३२ रा. बेडग ता. मिरज) यांनी गुरुवारी रात्री उशिरा जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपी सदाशिव यास अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भिमू जाबगोंड यांची शेतजमीन बिळूर ते मेंढेगिरी रस्त्यावर बिळूर पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर डोणपीर भागात आहे.शेतातील मळ्यात दोन मुलासमवेत ते राहात होते त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. त्यांना एकूण तीन मुले होती त्यापैकी एका मुलाचा अपघातात येळदरी ता.जत येथे वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे. सदाशिव याचा विवाह झाला आहे. भिमू यांची पत्नी कौटुंबिक वादातून कोट्टलगी ता.अथणी जि. बेळगाव येथे राहत आहे. भिमू जाबगोंड हे सतत बाहेर राहत होता मागील दहा - पंधरा वर्षापासून ते बाहेरच होते. मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी ते बिळूर येथे मुलाकडे राहण्यासाठी आले होते.          

भिमू यांच्याकडे पाच तोळे सोने व पाच लाख रुपये शिल्लक होते या पाच तोळे सोन्यापैकी चार तोळे सोने त्यानी त्यांची मुलगी महानंदा कोरे हिला दिले होते व पाच लाख रुपयेही इतरांना ऊसनवार दिले होते ही ऊसनवार रक्कम तू मागून घे असे त्याने मुलगा सदाशिव याला सांगितले होते. परंतु हे सदाशिव याला मान्य झाले नाही तुम्ही पैसे इतरांना दिले आहेत व पाच तोळे सोन्यापैकी चार तोळे सोनेही मुलीला दिले आहे आता यापुढे आम्ही तुमचा सांभाळ करणार नाही असे त्याने वडिलांना सांगितले होते. यामुळे मागील कांही दिवसापासून घरात त्याच्यात वाद सुरू झाला होता .या वादामुळे सोमवारी रात्री  साडेआठ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्यात जोरदार भांडण झाले त्यानंतर सदाशिव याने भिमू यांच्या डोक्यात दगड घालून व विळ्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले, बेशुद्ध अवस्थेत मंगळवारी सकाळी उपचारासाठी सांगली सर्वोपचार रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे करत आहेत.


Post a Comment

0 Comments