जत पोलिस ठाण्याच्या आवारात संशयित आरोपीचा सँनिटायझर पिऊन आत्महत्येच्या प्रयत्न

 


आरोपी सुभाष वाघमोडे 

जत वार्ता न्यूज नेटवर्क/प्रतिनिधी: जत पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील संशयित आरोपी सुभाष राजू वाघमोडे (वय ३० रा. शंकर कॉलनी, उमराणी रोड जत) याला चोरीच्या गुन्ह्यातील चौकशीसाठी आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जत पोलिस ठाण्यामध्ये बोलावले असता त्याने चौकशीच्या भितीपोटी खिशातील सँनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्‍न केला. या घटनेनंतर त्याला उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात न्हेण्यात आले. व पुढील उपचारासाठी सांगली येथे पाठवले असता त्याने कोरोना मुळे सांगली येथे जाण्यास नकार दिल्याने त्याच्यावर जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याबाबत अधिक माहिती अशी की, भंगार चोरीचे साहित्य विकत घेतल्याप्रकरणी संशयित आरोपी सुभाष राजू वाघमोडे यास आज जत पोलिस ठाण्यात  चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यांच्या विरोधात यापूर्वी तिन गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. 

पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी त्याने पोलिस ठाणे आवारातच सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन वर्षापूर्वी कंठी ता.जत येथे बंद पडलेल्या स्टोन क्रशर मधील भंगार साहीत्याची चोरी झाली होती. याबाबत बाळासाहेब पाटील रा.शेगाव ता.जत यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी दोन संशयित आरोपींना जत पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित  आरोपींनी स्टोन क्रेशर मधील चोरी केलेले भंगार सुभाष वाघमोडे याच्या दुकानात घातले आहे. अशी माहिती तपास करताना पोलिसांना दिली होती. त्यानुसार जत पोलिसांनी सुभाष वाघमोडे याला नोटीस देऊन चौकशीसाठी जत पोलिस ठाण्यात समक्ष आज बोलवले होते. पोलिस ठाण्याच्या आवारात आल्यानंतर  वाघमोडे याने सॅनिटाझर पिवून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलीसात खळबळ उडाली त्यानंतर तात्काळ उपचारासाठी त्याला जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.

Post a Comment

0 Comments