मोडून पडला संसार ; धायगुडे कुटूंबियांना हवा मदतीचा हात । पुरात वाहून गेलेल्या पिंटू धायगुडेची ह्रदयविदारक कहाणीने अनेकांचे डोळे डबडबले


जत/प्रतिनिधी: जत पूर्व भागातील बोर नदी पात्रात जत तालुक्यातील सनमडी येथील ३२ वर्षीय तरुण परमेश्वर उर्फ गावकऱ्यांचा लाडका पिंटू धायगुडे हा ट्रॅक्टरमध्ये बसून दुधाचे कॅड घेवून जात असताना ट्रॅक्टर करजगी- भिवर्गी पुलावर पलटी झाला. या दुर्घटनेत पुरात वाहून जावून पिंटूचा मृत्यू झाला. पुरात वाहून गेलेल्या पिंटूचा मृतदेह तिसऱ्या दिवशी मिळाला व समस्त सनमडी गावावर शोककळा पसरली. 

धायगुडे परिवारातील कर्ता असलेला पिंटूचा मृत्यू झाल्याने त्यांचा संसार मोडून पडला. आजारी वयोवृद्ध आई, वडील, पत्नी व दोन चिमुकले मुले उघड्यावर पडली.या घटनेने सारे गाव हळहळले. पिंटू धायगुडेच्या मृत्यूने  त्यांचा कुटूंबियाचा कणाच मोडून पडला आहे. मोडून पडलेल्या पिंटूच्या संसाराला, त्याच्या कुटूंबियाला मदतीची नितांत गरज आहे. समाजातील हजारो दानशूर व्यक्तींचे हात जर मदतीसाठी पुढे आले तर पिंटूच्या कुटूंबियांना आयुष्यभराचा मोठा हातभार लागेल हे मात्र निश्चित.

घरात अठराविश्व दारिद्र, गरिबी ही पाचवीला पुजलेली. या बिकट परिस्थीशी दोन हात करत न रडता सनमडी येथील पिंटू धायगुडे या ३२ वर्षीय तरुणाने स्वाभिमानी लढा देत आपला जीवन संघर्ष सुरू ठेवला. पिंटू यांचे वडील भीमराव हे विहीरीवर कामाला जायचे. काम करताना एकदा विहिरीत पडले व त्याला जबर दुखापत झाली .आई सखुबाई ही कायम आजारी. पत्नी राजश्री ही संसारात पिंटूला मदत करायची. मुले जय व ओम हे दोन लहान चिमुकली मुले पण ती ही आजारी. या दोन्ही मुलांना फिट येत असल्याने त्यांच्या दवाखाना हा सुरूच होता. अशा प्रतिकूल परिस्थीतीतही पिंटूचा संसार सुरूच होता. संसारात पिंटूचा गाडा रुतला असला तरी त्याने त्याचे कधी प्रदर्शन केले नाही उलट तो हसऱ्या चेहऱ्याने गावातील कारण असो की कोणाचे मरण असो तो मदतीसाठी कायम सज्ज असायचा. सर्वांच्या हाकेला ओ देणारा पिंटू हा गावचा लाडका होता.

अशा या पिंटूने प्रतिकूल परिस्थीवर मात करत  स्वतःची पीक अप चारचाकी गाडी घेतली व ती चेन्नई डेअरीला दूध संकलन करण्यासाठी लावली. चेन्नई डेअरीसाठी सनमडी भागात दूध संकलन करून भिवर्गी येथे तो डेअरीला दूध पोच करत असे. पिंटूचा संसार कसाबसा बऱ्यापैकी चालला होता. पण नियतीच्या मनात काही वेळलेच चालले होते. काही दिवसांपूर्वी पडत्या पावसाने पिंटूचे राहते घर पडले. कसातरी निवारा करून उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पिंटूची धडपड सुरू होती. पण  नियती त्याची पाठ सोडण्यास तयार नव्हती.

नेहमीप्रमाणे १५ ऑक्टोबरला पिंटू हा दूध संकलन करून भिवर्गीला निघाला. करजगी येथे आल्यानंतर भिवर्गीलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बोर नदी दुधडी भरून वाहत होती. पुलावरून पाणी वाहत होते. दूध संकलन केलेले दूध चेन्नई डेअरीला पोच न केल्यास त्या दुधाची रक्कम आपल्या नावावर पडणार या चिंतेत असतानाच कंपनीने भाड्याने लावलेल्या ट्रॅक्टरमध्ये दूध घेवून येण्यास सांगितले. पीक अप मधील दुधाचे कॅड ट्रॅक्टरमध्ये चढविले. व त्या ट्रॅक्टरमध्ये ठेवलेल्या कॅडवर बसून पिंटू दूध घालण्यास भिवर्गीला निघाला. ट्रॅक्टर पुलाच्या मध्यभागी येताच पुलावर पलटी झाला. ट्रॅक्टर पलटी होताच  ट्रॅक्टर चालक सोमू लायाप्पा कळळी याने प्रसंगावधान राखून उडी मारून स्वतःचा जीव वाचविला.

ट्रॅक्टरवर बसलेला पिंटू हा बोर नदी पात्रात पडला. त्यापाठोपाठ त्याच्या अंगावर दुधाचे कॅन पडल्याने तो जखमी झाला. काही कळायच्या आत तो बोर नदी पात्रात वाहून चालला. स्वतःला वाचविण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता पण त्याचे काही चालले नाही. ही सारी घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली व सनमडीसह जतकरांच्या ह्रदयाचा ठोका चुकला.

वाहून गेलेला पिंटूचा शोध दोन दिवसांनी लागला. १७ ऑक्टोबरला त्याचा मृतदेह मिळाला. पिंटूच्या अशा जाण्याने सारेच हळहळले. पिंटू याच्या मृत्यूनंतर चेन्नई डेअरीचे कोणीही त्यांच्या कुटूंबियाकडे साधी विचारपूस करण्यासही फिरकले नाहीत ही शोकांतिका. भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार व ग्रामस्थांनी हा विषय उचलून धरल्यानंतर ट्रॅक्टर चालक सोमू कळळी व चेन्नई डेअरीचे व्यवस्थापक लिंगाप्पा जोगर या दोघांवर पिंटूच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल झाला आहे.

या दुर्घटनेत पिंटूचा मृत्यू झाला. घरातील कर्ता माणूसच गेला व सारे चित्र पालटले. पिंटूच्या माघारी त्याचे कसे व्हायचे हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. राहायला घर नाही, घरी वयोवृद्ध आजारी आई, वडील, दोन लहान मुले ते ही आजारी. या साऱ्यातून मार्ग काढण्यासाठी पिंटूच्या कुटूंबियांना मदतीचा हात हवा आहे. समाजातील दानशूर व्यक्तीने फुल नाही फुलाची पाकळी मदत केली तर मोडून पडलेल्या पिंटूच्या कुटूंबियांना मोठा धीर मिळू शकतो.

ग्रामस्थांनी केले मदतीचे आवाहन

पिंटू धायगुडे या तरुणाच्या मृत्यूने सनमडी ग्रामस्थ हळहळत आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, सनमडी मधील आर्मी आधार फौंडेशनची टीम व ग्रामस्थ  धायगुडे कुटूंबियांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.  समाजातील दानशूर व्यक्तीने 8380823343 गुगल पे, 8380823343 फोन पे  8380823343 अमेजोन पे 

नेट बेंकींग साठी ac no & name - sachin salgar 30562363427 State bank 🏦 of India .

  IFSC code: SBIN0000569 येथे आपली मदत जमा करावी असे आवाहन सनमडी ग्रामस्थांनी केले आहे.

 


Post a Comment

0 Comments