जत तालुक्यातील जनावरांमध्ये लंम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव; पशुपालक धास्तावला

पशुपाल्यानी खबरदारी घेण्याची गरज

जत/प्रतिनिधी : जत तालुक्यातील जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसीजचा (एल.एस.डी.) प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. हा आजार नवीन असल्याने शेतकऱ्यांना याबाबत फारशी माहिती नाही. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुपालकांनी विशेष खबरदारी घ्यावी तसेच जनावरांमध्ये तशी लक्षणे आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जत पंचायत समिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ.व्ही.बी.जवणे व डॉ.एस.एस. सोनार यांनी केले आहे.

जत तालुक्यात एकूण जनावरांची संख्या ५ लाख ५९ हजार १०१ इतकी आहे. तालुक्यातील अचकनहळ्ळी डफळापूर, बनाळी, आवंढी, शेगाव, रामपूर, करजगी, बोर्गी, बालगाव, हळ्ळी, उमदी या गावांमधील जनावरांमध्ये लंम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. प्राण्यांमध्ये लम्पि स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून त्यांची माहिती द्यावी. तसेच आजारी प्राणी अन्य निरोगी प्राण्यांपासून वगेळे बांधावे. गोठा व परिसर स्वच्छ आणि हवेशीर ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही याची पशुपालकांनी दक्षता घ्यावी. तसेच बाधित जागेचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा वापर करावा. शिवाय पशुधनाच्या अंगावर आणि गोठ्यात फवारणी करावे. प्रादुर्भावग्रस्त भागात जनावरांची ने-आण करणे किंवा खरेदी-विक्री करणे या गोष्टी टाळाव्यात. हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर विशेष उपचार नाही. परंतु जखमांमध्ये जिवाणूचा संसर्ग होवून इतर आजार वाढू नये म्हणून प्रतिजैविके व इतर औषधे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने घ्यावीत. असे आव्हान पशुपालकांना करण्यात येत आहे.

लंम्पी आजार नवीन असल्याने लवकर समजत नाही. जनावरांना ताप येणे, डोळे, नाकातून स्राव येणे, चारा कमी खाणे, भूक मंदावणे आदी सुरुवातीची लक्षणे दिसत आहेत. हा आजार वेगाने पसरणार असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून प्रभावी उपाय योजनांची गरज आहे, असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. माशा व गोचीड मार्फत हा आजार पसरण्याचा जास्त धोका असल्याने गोठा स्वच्छ ठेवावा असे आव्हान पशुधन अधिकारी डॉ. जवणे यांनी केले आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. व 18 हजार लसी मागवण्यात आल्या आहेत. त्या देण्याचे कामही सुरू आहे. असे डॉ.एस.एस. सोनार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments