शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतिपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा- पालकमंत्री जयंत पाटील

नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्या

सांगली: जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतिपिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव सादर करावा. कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे काही घरांची अंशत: अथवा पूर्णता पडझड झाली आहे त्यांचे पंचनामेही तात्काळ करावेत. मयत व्यक्ती व मृत जनावरे याबाबत मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. सामान्य वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खचलेले रस्ते, पूल आदिबाबत जी लहान स्वरूपाची कामे आहेत त्याची तात्काळ दुरूस्ती सुरू करावी. जी मोठी कामे आहेत त्याला निधी मागणीसाठी तात्काळ सर्व्हे करून प्रस्ताव सादर करावेत.  

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विमा कंपन्यानी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे त्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती विहीत वेळेत विमा कंपन्यांना द्यावी. यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती विमा कंपन्यांना सादर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. यापासून कोणीही शेतकरी माहिती न दिल्यामुळे वंचित राहू नये याची काळजी घ्यावी. महावितरणने ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा खंडित झाला आहे तो आवश्यक दुरूस्ती करून तात्काळ सुरू करावा, अशा सूचना देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे जिल्यातील 123 गावे बाधित झाली असून 9 व्‍यक्तींचा मृत्यू, मृत पशू 28 व पक्षी 2800, 804 घरांची पडझड, नजरअंदाजे 8 हजार 276 हेक्टर शेतिपिकांचे नुकसान झाल्याचे सांगून पंचनाम्याची कार्यवाही चालू असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत सर्व कुटुंबाची तपासणी होईल याची खातरजमा करावी. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार डॉ. सुरेश खाडे व आमदार अनिल बाबर यांनी मौलिक सूचना मांडल्या.


Post a Comment

0 Comments