जत पूर्व भागात खाजगी सावकारांचा धुमाकूळ

जत/प्रतिनिधी: जत पुर्व भागातील खासगी सावकारांकडून कर्जदारांना रात्री, अपरात्री मोबाईलवरून कर्ज परतफेडीसाठी धमक्या येऊ लागल्याने या सावकारांकडून कर्ज घेतलेले कर्जदार भयभीत झाले असून जिल्हा पोलीस प्रमुखांनी अशा सावकारांना शोधून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी भयभीत कर्जदारांकडून करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत तालुक्यातील गावोगावी प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसेलेले खासगी सावकारांचा उत आला आहे. हे खासगी सावकार अडल्या नडलेलेल्यांना मदत करण्याच्या नावाखाली गोरगरिबांना व्याजाने पैशाचा पुरवठा करित आहे. त्यासाठी त्यांनी एजंट लोकांची नेमणूक ही केली आहे. हे एजंट लोक पैशाअभावी अडलेले लोक हेरून त्यांना गोड बोलून खासगी सावकारांपर्यंत पोहोचविण्याचे काम करित आहेत. अशा अडल्या नडलेलेल्यांना या सावकारांकडून शेकडा दहा ते वीस टक्के व्याजाने कर्ज देऊन या कर्जाला तारण म्हणून हे खासगी सावकार या अशिक्षीत व लाचार कर्जदारांकडून त्यांच्या जमिनी आपल्या स्वताच्या नावावर न करता मध्यस्थी माणसाच्या नावावर करून या मध्यस्थामार्फत कर्जाचे व्याज वसुल करण्याचे काम करित आहेत. 

खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची मुद्दल रक्कम तशीच राहून कर्जदार हे व्याज भागवूनच मेटाकुटीस येत आहेत. जत तालुक्यातील पुर्व भागात अशा खासगी सावकारांकडून कर्ज घेतलेले कर्जदार मोठ्या प्रमाणात आहेत. जत तालुक्यात व्याजाने पैसे देणारे खासगी सावकारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असून या सावकारांनी आपल्याकडून कर्जदारानी घेतलेले कर्ज व व्याजाच्या वसुलीसाठी गुंड पाळले आहेत. हे गुंड कर्जदार लोकांना आडरस्त्यात गाठून त्यांना धमकी देणे, मारहाण करणे, त्यांची जनावरे ताब्यात घेणे, कर्जदारांची वाहने जबरदस्तीने ओढून नेणे, कर्जदारांना रात्री अपरात्री मोबाईलवरून कर्ज परतफेडीसाठी धमक्या देणे असे प्रकार करू लागले आहेत. 

ग्रामीण भागात अशा खासगी सावकारांकडून त्वरीत कर्ज मिळत असल्याने अनेकजन अशा खासगी सावकारांचे शिकार झाले आहेत. परंतु सावकार हे गावातीलच प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने व ते सोबत गुंड लोक पाळून असल्याने कर्जदार लोक हे निमुटपणे या खासगी सावकारांचा व त्यांच्या गावगुंडाकडून होणारा त्रास सहन करित आहेत. आतापर्यंत या खासगी सावकारांनी अनेक कर्जदारांच्या जमिनी, त्यांच्या शेतात पिकत असलेले धान्य या कर्जदारांच्या महिलांच्या गळ्यातील सोने गिळंकृत केले आहे. 

जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षीत गेडाम यांनी सांगली जिल्ह्यातील खासगी सावकारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख यांनी जत तालुक्यातील पुर्व भागातील अशा अवैध मार्गाने खासगी सावकारीचा व्यवसाय करणारे सावकारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा खासगी सावकारांकडून आपले वर्चस्व गमाविलेल्या कर्जदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

जत तालुक्यातील बँकावर कोणाचे नियंत्रण

बँका वेळेवर कर्ज उपलब्ध करून देत नसल्याने ग्रामिण भागातील शेतकरी व नागरिकांना खाजगी सावकारांच्या तावडीत सापडत आहेत. प्रशासनाने वेळीच खबरदारी घेण्याची गरज.

 

जत तालुक्यात 25 परवानाधारक सावकार आहेत. यामध्ये उमदी, संख, वाळेखिंडी या गावात प्रत्येक एक अशी नोंद जिल्हा उपनिबन्धक यांच्याकडे आहेत. याच तालुक्यात खाजगी सावकारांची संख्या भरपूर आहे. या खाजगी सावकारांकडून ज्या व्यक्तिंची पिळवनुक होते, ते पोलिस ठाण्यात त्या सावकारा विरुद्ध तक्रार दाखल करण्यास पुढे येत नाहीत. कारण त्या सावकाराची दहशहत मोठी असते. यांना राजकीय पाठबळ असल्याने हे मोकाट असतात.

Post a Comment

0 Comments