जत/प्रतिनिधी: अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून न निघणारे आहे. नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामा करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. जत तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज तालुक्यातील अचकनहळ्ळी, येळवी, मुचंडी, रावळगुंडवाडी, डफळापुर व जत या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. जत येथे आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते, शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडलेला आहे. त्यांना दिलासा देऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न राज्यशासन करणार आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी व जत या भागाचा दौरा केला आहे. त्यानुसार नुकसानीचे पंचनामे प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्यात वेगवेगळ्या भागात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकार याचा एकत्रित पाने विचार करेल. अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी जत येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
0 Comments