तालुक्यातील अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची राजू शेट्टी यांनी केली पाहणी । अचकनहळ्ळी येथील बैल जोडी वाहून गेलेल्या शिंदे कुटुंबियांची घेतली भेट
जत/प्रतिनिधी : जत तालुक्यातील अचकनहळ्ळी येथील शेतकरी विनायक शिंदे यांची अवकाळी पावसामुळे ओढ्यास आलेल्या पुरात दोन बैल वाहून गेली आहेत. यावेळी माजी खा. राजु शेट्टी व स्वा.शे. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी शिंदे कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेवून त्यांना दिलासा दिला. यावेळी पशुधन आणि शेतकरी वाचविण्यासाठी सरकारने तिजोरी उघडी करावी अशी मागणी त्यांनी केली. राजू शेट्टी व महेश खराडे यांनी रविवारी अवकाळीने नुकसान झालेल्या तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील डफळापुर व अचकनहळ्ळी या गावास भेटी देऊन येथील शेतीची पाहणी केली.
यावेळी राजु शेट्टी बोलताना म्हणाले की, अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यात शेतीचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही प्रमाणात पशुधन आणि मनुष्यहानी देखील झाली आहे. कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आला होता. आता पुन्हा अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, पंचनाम्याचा बागुलबुवा न करता सरसकट हेक्टरी 25 हजाराची मदत त्वरित द्यावी. व तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत. सद्या केंद्र सरकार मदत देताना पक्षपाती धोरण घेत आहे. राष्ट्रीय आपती निधीतून केवळ त्यांची सत्ता ज्या राज्यात आहे. त्या ठिकाणी त्यांना तातडीने निधी दिला जातो, मात्र अन्य राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते. शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी विनायक माळी व अधिक माळी यांनी पुरात बैल गाडी कशी वाहून गेली, याची रहदृद्रवक कहाणी सांगितली. उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात पाणी तरळले. या प्रसंगी ह.ब.प. तुकाराम बाबा महाराज, रमेश माळी, आबा गावडे, पिंटू मोरे, शहाजी साळे, सुधीर माळी, भैरव माळी, शिवाजी पाटील, दामाजी दुबळ, सूरज पाटील, महेश जगताप, निखिल कारंडे, मारुती देवकर, सुरेश पाचिब्रे आदीसह शेतकरी उपस्थित होते.
0 Comments