राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी केली जत तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी । बांधावर जावून पंचनामे करण्याचे दिले आदेश

जत मध्ये घेण्याचे आलेल्या आढावा बैठकीत अधिकारी फैलावर


जत/प्रतिनिधी : परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे बरेच नुकसान झाले आहे. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेला शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करा. नुकसानीचा एकत्रित अहवाल तातडीने राज्य शासनाला सादर करण्यात यावा, असे आदेश राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. तर राज्यातील सरकार नेहमी शेतकर्‍यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. शेतकर्‍यांच्या झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे केले जातील, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत दिली जाईल, असा विश्वास डॉ. कदम यांनी दिला. जत येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकी दरम्यान ते बोलत होतो.

जत तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तर पंचायत समिती येथे कोरोना, कृषीसह इतर विषयासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. ती कमीच रहावी, यासाठी शासनाची "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" ही मोहीम चांगली राबवा. एकही घर वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या. असे आदेश दिले. यावर गोंधळेवाडी गावात एकही सर्वेक्षण झाले नसून ग्रामस्थांनी विरोध केला आहे. असे जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी निदर्शनास आले. यावर राज्यमंत्र्यांनी सहकार्य करत नसेल त्याठिकाणी कारवाई करा, अशा सूचना दिल्या.

यावेळी अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव म्हणाले मिरज तालुका लहान असून 16 वेदर स्टेशन आहे. मात्र, विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्यात आठच आहेत. त्यात वाढ व्हावी, अशी मागणी केली. याबाबत विचार करून लवकरच वेदर स्टेशन उपलब्ध करण्यासाठी तरतूद करू असे डॉ. कदम यांनी सांगितले. तसेच जत पंचायत समिती अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घरकूल व शौचालय मंजूर करण्यासाठी पाचशे रूपयांची मागणी करतात, अशा तक्रारी उपस्थितांनी केल्या. मंत्र्यांनी तात्काळ याची दखल घेऊन गटविकास अधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. 

यावेळी आ. विक्रमसिंह सावंत, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसिलदार सचिन पाटील, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, बीडिओ अरविंद धरनगुत्तीकर, आदीसह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

सहनिबंधकांवर निलंबनाचे आदेश....

सहायक निबंधक ए. एम. यशवंत हे महिन्यात एकदाच कार्यालयात हजर राहतात. नागरिकांच्या अनेक अडचणी आहेत. बँका शेतकर्‍यांना कर्ज नाकारते, अशा अनेक तक्रारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी केल्या. त्यावर राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी वरिष्ठांना फोनवरुन सहायक निबंधक यशवंत यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.Post a Comment

0 Comments